शनी-राहु-केतु गोचर: ५ राशींना संमिश्र, धनहानी शक्य; अशुभ योग प्रतिकूल, अखंड सावध राहावे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 01:37 PM2023-10-12T13:37:57+5:302023-10-12T13:46:48+5:30

राहु-केतुनंतर शनी ग्रहाचे होणारे गोचर काही राशींना काहीसे तापदायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना अतिशय विशेष ठरत आहे. या महिन्याच्या अखेरीस क्रूर आणि छाया ग्रह मानले जाणारे राहु आणि केतु राशीपरिवर्तन करणार आहेत. राहु आणि केतु केवळ वक्री चलनानेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. आताच्या घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत आहेत.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. या चंद्रग्रहणानंतर लगेचच राहु आणि केतु राशीपरिवर्तन करून अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करतील. एका राशीत सुमारे १८ महिने राहु आणि केतु विराजमान असतात. तसेच ते नेहमी एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात.

राहु आणि केतुच्या राशीपरिवर्तनानंतर नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत मार्गी होत आहे. काही महिन्यांपूर्वी शनी कुंभ राशीत वक्री झाला होता. या तीनही ग्रहांचे गोचर काही राशींसाठी संमिश्र ठरणार आहे. या काळात सावधगिरी बाळगावी, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनी गोचर संमिश्र ठरू शकेल. जीवनात तणाव वाढू शकतो. व्यावसायात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकेल. पैसे पाण्यासारखे खर्च होतील. अचानक काही खर्च उद्भवू शकतात ज्याचा विचारही केला नसेल. वैवाहिक संबंध प्रभावित होऊ शकतात. पैशाशी संबंधित बाबींमध्ये, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडू शकतात. विवेकाने विचार करावा.

कर्क राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनी गोचर संमिश्र ठरू शकेल. काही प्रतिकूल परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक आयुष्यात अनेक कारणांमुळे तणाव वाढू शकतो. वाचवलेले पैसे अनावश्यक खर्चामुळे वाया जातील. काही कारणांमुळे कर्ज वाढू शकते. कोणाला पैसे उधार देऊ नका. अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात. जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. वैवाहिक जीवनात वाद निर्माण होऊ शकतात. मालमत्तेचा योग्य हिशेब ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनी गोचर संमिश्र ठरू शकेल. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. कोणत्याही कामात कठोर परिश्रम करूनही अपेक्षित फळ मिळेलच असे नाही. व्यावसायात काही बदल होऊ शकतात. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. व्यावसायिकांची देणी अडकल्यास त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. तणावाचा सामना करावा लागेल. या बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे चांगले. वाहन काळजीपूर्वक चालवा. आव्हानांचा सामना संयमाने करण्याचा सल्ला दिला जात आहे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनी गोचर संमिश्र ठरू शकेल. आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे. कोणत्याही नवीन प्रकल्प किंवा कोणत्याही करारावर काम करताना दहावेळा विचार करावा. सर्वबाजूंचा आढावा घ्यावा. आर्थिक बाबतीत नुकसान होऊ शकते. व्यवसायात भागीदाराशी वाद होऊ शकतात. कोणत्याही मुद्द्यावर मोकळेपणाने बोलले तर बरे होईल.

मीन राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनी गोचर संमिश्र ठरू शकेल. अनेक समस्या वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या नात्यात कटुता वाढू शकते. आर्थिक बाबतीतही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. काही अनावश्यक खर्चामुळे महत्त्वाचे काम प्रभावित होऊ शकते. व्यवसायिकांचे पैसे अडकल्यामुळे भागीदारांशी वाद होऊ शकतात. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. मकर राशीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीचा मधला टप्पा तर मीन राशीचा पहिला टप्पा सुरू आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.