२७ जूनला मंगळाचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना अच्छे दिन; शुभलाभाचा मंगलमय कालावधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 03:30 PM2022-06-19T15:30:46+5:302022-06-19T15:34:29+5:30

Mars Transit in Aries 2022: मंगळाचा स्वराशीत होत असलेला प्रवेश काही राशींना अत्यंत लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

मंगळ ग्रह नवग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ ग्रहाचे गोचर महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, जून महिन्यात मंगळ गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. (mars transit in aries 2022)

२७ जून रोजी मंगळ मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ ग्रह ऊर्जा, जमीन, गती, भावंडे, शौर्य, शक्ती, पराक्रम यांचा कारक मानला जातो. मंगळाच्या मेष राशीतील प्रवेशाचा देश, जग आणि सर्व राशींवर परिणाम होईल, असे सांगितले जात आहे. (mangal gochar in mesh rashi 2022)

मंगळाच्या मेष प्रवेशाचा सर्व राशींवर प्रभाव पडू शकेल. मात्र, अशा ५ राशी आहेत, ज्यांच्यावर मंगळाच्या संक्रमणाचा शुभ परिणाम होणार आहे. मंगळ जेव्हा मेष राशीतील प्रवेशाने कोणत्या राशींना चांगले दिवस येतील हे जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना मंगळ ग्रहाचा प्रवेश सकारात्मक आणि अनुकूल मानला जात आहे. या काळात अधिक उत्साह वाटू शकेल. तुम्हाला दिलेली जबाबदारी सहज आणि वेळेत पूर्ण करू शकाल. करिअरसाठी कोणताही नवीन उपक्रम किंवा कोणतेही रचनात्मक कार्य सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्यांना या कालावधीत यश मिळू शकते. प्रयत्नांमध्ये सकारात्मकता येईल आणि प्रयत्न अपेक्षित परिणाम देऊ शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मेष प्रवेश शुभ परिणामकारक ठरू शकेल. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. आर्मी, पोलीस, एअरफोर्स इत्यादींमध्ये काम करणाऱ्या लोकांचा प्रभाव वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन उर्जेने काम कराल. तुमच्या कामाचा वेग वाढू शकेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. भागीदारीत व्यवसायात शुभ परिणाम मिळू शकतील.

सिंह राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मेष प्रवेश भाग्यकारक ठरू शकेल. या काळात मानसिक शांतता लाभू शकेल. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येऊ शकतील. काही महत्त्वाच्या कामामुळे तुम्ही प्रवासाला जात असाल तर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. या काळात तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यास सक्षम ठरू शकाल. तुमच्यापैकी अनेकांना तुमच्या वडिलांची मदत मिळेल, ज्यामुळे चांगला फायदा होईल.

धनु राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मेष प्रवेश मंगलमय ठरू शकेल. या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना परदेशी संपर्काद्वारे नफा होऊ शकतो. विवाहेच्छुक मंडळींना चांगली स्थळे येऊ शकतील. न्यायालयीन प्रकरणात सकारात्मक बातमी मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत उत्तम वेळ जाऊ शकेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगळाचा मेष प्रवेश अनुकूल परिणाम देणारा ठरू शकेल. या कालावधीत तुम्ही विरोधकांवर विजय मिळवू शकाल. धैर्य आणि शक्ती वाढू शकेल. क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोकांना अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता विकसित होईल. प्रेमात असलेल्या लोकांच्या नातेसंबंधात अधिक मजबूती येईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये बसणाऱ्यांना यश मिळेल.