Sun Transit Virgo : सूर्याचं कन्या राशीत गोचर, महिनाभर बुधादित्य योग; या राशींच्या लोकांची होणार भरभराट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 08:16 AM2022-09-08T08:16:01+5:302022-09-08T08:16:01+5:30

१७ सप्टेंबर रोजी सूर्य आपल्या सिंह राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहे.

सूर्य आपली सिंह राशी सोडून बुधाच्या कन्या राशीत गोचर करणार आहे. कन्या राशीतील बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होईल. हा योग पैसा आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जातो. हा योग तयार झाल्याने करिअर आणि पैशाच्या बाबतीत काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार असल्याचे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. पाहुयात कोणत्या आहेत या राशी.

मिथुन - कन्या राशीत बुधासोबत मिळून सूर्य बुधादित्य योग तयार करेल. या काळात सरकारी क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करत असेलेल्या लोकांनादेखील चांगली बातमी मिळू शकते. शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या लोकांसाठीही या कालावधी उत्तम ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि कामकाजातही सुधारणा होईल. जर संपत्तीचे व्यवहार करणार असाल तर या कालावधीत सतर्क राहावं लागेल. तसंच अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

सिंह - सूर्य सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. या कालावधीत सिंह राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसंच शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. या कालावधीत समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. विदेशातील कोणत्या व्यवहाराशी निगडीत असाल तर त्यात फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु कौटुंबीक जीवनात थोडं संभाळून राहायला हवं. वरिष्ठांसोबत बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा.

कन्या - या राशीच्या लोकांना सूर्याचं हे गोचर खास ठरू शकतं. या कालावधीत आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात मान सन्मान वाढेल आणि काही लोकांना अतिरिक्त जबाबदारीही मिळू शकते. दांपत्य जीवन सामान्य राहिल. आरोग्यासाठीही हा काळ उत्तम ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा कालावधी उत्तम ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना या कालावधीत यश मिळू शकतं.

वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्याचं हे गोचर लाभदायक ठरू शकतं. या कालावधीत सामाजिक जीवनात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. या कालावधीत तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळू शकतात. भविष्याबाबतही सकारात्मक राहाल. अति आत्मविश्वास नुकासान करू शकतो. या कालावधीत तुम्हाला भावा-बहिणीचीही साथ मिळण्याची शक्यता आहे.

धनु - सूर्याचं हे गोचर धनू राशीच्या लोकांसाठी उत्तम ठरण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यापार क्षेत्रातील लोकांना हा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. कौटुंबीक जीवनात तुमचं महत्त्व वाढू शकतं. तुम्हाला वडिलांचीही साथ मिळेल. आर्थिक दृष्ट्याही हा कालावधी तुम्हाला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत अध्यात्माकडेही ओढ वाढू शकते.