अमरनाथ यात्रा: बाबा बर्फानी शिवलिंग, कबुतराची जोडी अन् रहस्यमयी साधू; पाहा, १० अद्भूत तथ्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:02 AM2023-06-27T10:02:14+5:302023-06-27T10:25:00+5:30

Amarnath Yatra 2023: अमरनाथ यात्रेला वेगळे महत्त्व असून, दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानी शिवलिंगाचे दर्शन घेतात. जाणून घ्या, काही तथ्ये...

Amarnath Yatra 2023: आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे. यंदा श्रावण महिना अधिक आहे. श्रावण महिना महादेव शिवशंकराला समर्पित असल्याची मान्यता आहे. चातुर्मास व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांनी भारलेला काळ असतो. भारतात अनेक यात्रा केल्या जातात. यातील अमरनाथ यात्रा सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते.

भारतातील सर्वश्रेष्ठ मानली जाणारी शिवस्थाने म्हणजे १२ ज्योतिर्लिंग. याशिवाय देशभरात महादेवांची हजारो मंदिरे असल्याचे पाहायला मिळते. पैकी जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात असलेल्या अमरनाथ गुहेत बाबा बर्फानीचे शिवलिंग प्रकटते. जून महिन्याच्या सुरुवातीला शिवलिंग हळूहळू पूर्ण रुप घेते. साधारण जुलै महिन्यात अमरनाथ यात्रा सुरुवात होते. ही यात्रा ऑगस्टपर्यंत सुरू असते.

अमरनाथ येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. हे शिवलिंग साधारणपणे ८ ते १० फूट उंचीचे असते. शिवलिंगाचा आकार हवामानाप्रमाणे कमी जास्त होत असतो. शिवलिंगाचा आकार चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतो, असेही मानले जाते. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक अमरनाथ यात्रा करतात.

नैसर्गिक बर्फापासून निर्माण झाल्यामुळे त्याला स्वयंभू हिमानी शिवलिंग असेही म्हणतात. अमरनाथ गुहेचा परिसर अतिशय संवेदनशील आहे. येथे अनेकदा दहशदवादी कारवाया झाल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेकदा ही यात्रा रद्द केली गेली आहे. अमरनाथ गुहेबाबत अनेक रहस्ये सांगितली जातात. याची उकल अद्याप कुणालाही करता आलेली नाही.

अमरनाथ गुहेत प्रकट होणाऱ्या शिवलिंगाबाबत अनेक रहस्ये दडलेली आहे. हे शिवलिंग तयार होण्यासाठी लागणारे पाणी नेमके कुठून पाझरते, याचा शोध अद्याप लागलेला नाही. शिवलिंग तयार होण्यासाठी पाणी नेहमी झिरपत असते. तसेच चंद्रकलेप्रमाणे या शिवलिंगाचा आकार कमी-जास्त होत असतो, अशी मान्यता आहे. जुलै महिन्यापूर्वी हे शिवलिंग संपूर्ण स्वरुपात प्रकट होते.

अमरनाथ गुहेत असलेल्या शिवलिंगाच्या आजूबाजूला असलेला बर्फ हा मऊ आणि ठिसूळ असतो. मात्र, प्रकटणारे शिवलिंग हे एकदम कणखर असते. त्यामुळे हे कसे शक्य होते, याबाबत अद्यापही ठोस माहिती हाती लागू शकलेली नाही.

दुसरे म्हणजे अनेक किलोमीटर पायी चालत आल्यावर अमरनाथ गुहेत पोहोचल्यावर माणसाला एकदम उत्साहित झाल्यासारखे वाटते. सगळा थकवा दूर होऊन शरीरात चैतन्य संचारते, असे का होते, याबाबतीतही गुढ कायम आहे.

महादेव शिवशंकर पार्वती देवीला अमरत्वाचे रहस्य सांगत असतात, तेव्हा त्या गुहेच्या बाहेर एक कबुतराची जोडी येऊन बसते. अमरत्वाचे रहस्य ऐकताना देवी पार्वतीला झोप लागते. मात्र, कबुतराची जोडी महादेवांच्या वाणीतून निघणारे रहस्य ऐकते आणि अमर होते, अशी मान्यता आहे.

अमरनाथ गुहेजवळ आजच्या काळातही एक कबुतराची जोडी उपस्थित असते. मात्र, ती सर्वांना दिसत नाही. ज्या व्यक्तीला ती जोडी दिसते, त्याला मोक्ष प्राप्त होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महादेव शिवशंकराने पार्वती देवींना अमरत्वाचे रहस्य सांगण्यासाठी निर्जन ठिकाणी असलेल्या गुहेत नेले. तेथे कुणीही येणार नाही, याची दक्षता घेतली.

आपल्या गळ्यातील शेषनाग, अनंतनाग यांना दूरवर सोडले, अशी मान्यता आहे. ती ठिकाणे आता शेषनाग झील, अनंतनाग, पिस्सु टॉप अशा नावांनी ओळखली जातात. नीलमत पुराणात यासंदर्भातील उल्लेख आढळून येतो.

या ठिकाणी असलेल्या गुहेत शिवशंकरांकडून अमरत्वाचे रहस्य सांगितले गेले म्हणून या गुहेला अमरनाथ गुहा म्हटले जाते. तसेच या गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होत असल्यामुळे याला बाबा बर्फानी या नावानेही संबोधले जाते.

वास्तविक बूटा मलिक नामक मुस्लिम इसमाने लावला आहे. या परिसरात तो शेळ्या, मेंढ्या चरायला नेत असे. एकदा या पर्वतावर एक साधू या बूटा मलिकला भेटला. त्या साधूने त्याला कोळशाने हात शेकल्याचे पात्र दिले. बूटा मलिकने घरी येऊन पाहिले, तर त्यात सोन्याची खूप नाणी असल्याचे दिसले.

साधूबाबाला धन्यवाद देण्यासाठी तो पुन्हा त्या ठिकाणी गेला असता त्यांचा कुठेच पत्ता नव्हता. मात्र, एक गुहा दिसली. तीच ही अमरनाथाची गुहा असल्याचे सांगितले जाते. बूटा मलिक गुहेत गेले असता, त्यांना बर्फाचे शिवलिंग दिसले. त्यांनी ही बाब गावकऱ्यांना येऊन सांगितली.

सर्व गावकरी तातडीने त्या ठिकाणी गेले. सर्वांनी बाबा बर्फानी शिवलिंगाचे दिव्य दर्शन घेतले. या घटनेच्या तीन वर्षांनंतर अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली, असे सांगितले जाते. तेव्हापासून बूटा मलिक यांचे वंशज या अमरनाथ गुहेची आणि शिवलिंगाची सेवा व देखरेख करतात, असे सांगितले जाते.

दरवर्षी हजारो भाविक अमरनाथ यात्रा करतात. पहलगाम जम्मूपासून ५१५ कि.मी. अंतरावर आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जम्मू-काश्मीर पर्यटन केंद्रातून पहलगामला जाण्यासाठी सरकारी बस उपलब्ध आहे. पहलगाममध्ये स्वयंसेवी संस्थांमार्फत लंगरांची व्यवस्था केली जाते. येथून अमरनाथ यात्रा सुरू होते.