Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 09:03 IST2026-04-14T08:58:13+5:302026-04-14T09:03:22+5:30

Akshay Tritiya 2026: सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. पण काळजी करू नका! ज्योतिष शास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त साधण्यासाठी केवळ सोनेच हवे असे नाही. सोन्याला पर्याय म्हणून तुम्ही खालील ६ स्वस्त पण अत्यंत शुभ वस्तू खरेदी करूनही 'अक्षय्य' पुण्य आणि समृद्धी मिळवू शकता.

यंदा १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया(Akshaya Tritiya 2026) आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस. या दिवशी केलेली खरेदी आणि दान अक्षय्य (कधीही न संपणारे) मानले जाते. जर तुम्हाला सोने खरेदी करणे परवडत नसेल, तर शास्त्रात सांगितलेल्या या ६ पर्यायी वस्तू तुमच्या आयुष्यात भरभराट आणू शकतात. कोणत्या ते जाणून घेऊ.

सोन्याला सर्वात जवळचा आणि शुभ पर्याय म्हणजे चांदी. चांदी ही चंद्राची आणि शुक्राची धातू मानली जाते, जी सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. एक छोटे चांदीचे नाणे किंवा वस्तू खरेदी करून तिची लक्ष्मीपूजनाच्या वेळी पूजा केल्यास घरात बरकत राहते.

अक्षय्य तृतीया उन्हाळ्यात येते. या दिवशी मातीचा नवीन घडा खरेदी करणे आणि तो पाण्याने भरून दान करणे याला 'जलदान' म्हणतात. हे दान सोन्याच्या दानाइतकेच प्रभावी मानले जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात शीतलता व शांती नांदते.

तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि जिथे तुळस असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. अक्षय्य तृतीयेला नवीन तुळशीचे रोप घरी आणणे किंवा ते अंगणात लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते.

पिवळा रंग हा भगवान विष्णू आणि बृहस्पती (गुरू) ग्रहाचा आवडता रंग आहे. सोने खरेदी करणे शक्य नसेल तर पिवळ्या रंगाचे कापड, पिवळ्या फुलांचे रोप किंवा एखादी शोभेची पिवळी वस्तू खरेदी करावी. यामुळे गुरू ग्रहाचे पाठबळ मिळून भाग्योदय होतो.

वास्तू शास्त्रानुसार, मीठ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. अक्षय्य तृतीयेला सैंधव मिठाचे पाकीट घरी आणल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. या मिठाचा वापर जेवणात किंवा घर पुसताना केल्यास घरातील लोकांचे आरोग्य सुधारते आणि नकारात्मकता नष्ट होते.

कापूस हा शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे. या दिवशी कापूस किंवा कापसाच्या वाती खरेदी करणे शुभ मानले जाते. देवासमोर दिवा लावताना या नवीन कापसाचा वापर केल्याने घरातील वातावरण मंगलमय राहते आणि मानसिक शांतता लाभते.

भक्ती आणि श्रद्धेसमोर वस्तूची किंमत दुय्यम असते. अक्षय्य तृतीयेला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणून तिची मनोभावे पूजा केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील हे ध्यानात ठेवा.