राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनेराजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विदर्भाचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे अशरक्ष: धुमाकूळ घातला. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने राजस्थानचे कंबरडे मोडले आणि मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यानंतर प्रफुल हिंगे याचे वडील प्रकाश हिंगे भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. त्यानी आपल्या मुलाच्या यशाचे गुपित सांगत भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण ॲरॉन आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्रा यांचेही मनापासून आभार मानले.
२१७ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रफुल हिंगेने पहिल्याच षटकात राजस्थानला बॅकफूटवर ढकलले. त्याने पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर वैभव सूर्यवंशीला बाद केले. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि लुआन-द्रे प्रिटोरियस यांची विकेट घेतली. विशेष म्हणजे, हे तिन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या स्पेलमध्ये ३४ धावा देऊन एकूण ४ विकेट्स घेतले.
प्रफुल हिंगेची कामगिरी पाहून त्याचे वडील भारावून गेले. प्रफुल्लच्या यशाबद्दल बोलताना प्रकाश हिंगे यांनी सांगितले की, तो गेल्या १०-११ वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. सुरुवातीला १६ वर्षांखालील संघातून त्याने सुरुवात केली आणि त्यानंतर विविध वयोगटांमधून खेळत त्याने वरिष्ठ स्तरापर्यंत मजल मारली. क्लब हेच त्याच्यासाठी घर होते," अशा शब्दांत वडिलांनी त्याच्या क्रिकेटमधील समर्पणाचे वर्णन केले.
वरुण ॲरॉन आणि ग्लेन मॅकग्रा यांचे मानले आभार
प्रकाश पुढे म्हणाले की, "प्रफुल्लच्या कारकिर्दीत एक काळ असा होता की, जेव्हा तो पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याला साधे उभे राहणेही कठीण झाले होते. अशा कठीण प्रसंगात ग्लेन मॅकग्रा ग्लेन मॅकग्रा यांनी त्याला 'एमआरएफ पेस फाउंडेशन'मध्ये केवळ प्रशिक्षणच दिले नाही, तर त्याचा आत्मविश्वासही वाढवला. सरावासाठी त्यांनी प्रफुल्लला चक्क ऑस्ट्रेलियालाही नेले. तर, वरुण ॲरॉन यांनी प्रफुल्लच्या रिकव्हरीच्या काळात त्याच्याशी सतत संवाद साधून त्याला मानसिक बळ दिले."
हनुमान मंदिरात बसून पाहिला आयपीएलचा लिलाव
आयपीएल २०२६ चे ऑक्शन सुरू असताना प्रफुल्ल एका हनुमान मंदिरात बसून आपल्या फोनवर लिलाव पाहत होता. त्याची देवावर गाढ श्रद्धा असून, लिलावात नाव पुकारले जाणे हे जणू आपल्या प्रार्थनांना मिळालेले फळ आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली.
फिटनेसबद्दल काय म्हणाले?
"दुखापतीतून सावरल्यानंतर प्रफुल्लने आपल्या फिटनेसमध्ये कोणताही बदल होऊ दिला नाही. तो आपल्या फिटनेसला खूप गांभीर्याने घेतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि योगाभ्यास यामुळेच तो आज पुन्हा मैदानात ताकदीने उतरला आहे," असे प्रकाश हिंगे यांनी अभिमानाने सांगितले. प्रफुल्लची ही जिद्द आगामी आयपीएल हंगामात नक्कीच चर्चेचा विषय ठरेल, अशी आशा क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.