अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
By प्रदीप भाकरे | Updated: April 14, 2026 10:30 IST2026-04-14T10:28:50+5:302026-04-14T10:30:06+5:30
अयान अहमद तनवीर अहमद याने मुलींशी जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले होते

अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
प्रदीप भाकरे, अमरावती: परतवाडा येथील काही अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी करणाऱ्या विकृत तरुणाला अखेर अमरावती ग्रामीण पोलिसांनी सोमवारी उशिरा रात्री अयान अहमद तनवीर अहमद याला अटक केली. भाजपा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर पोलिसांनी ही वेगाने कारवाई केली.
अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) याने काही मुलींशी जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले होते. हे साहित्य त्याने सोशल मीडियावर व्हायरल केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती. भीतीपोटी कोणीही तक्रार देण्यास समोर येत नव्हते.
घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार अनिल बोंडे यांनी सोमवारी दुपारी भाजप शिष्टमंडळासह पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली. तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडू,असा थेट इशारा बोंडे यांनी दिला होता. या इशाऱ्याचा परिपाक म्हणून पोलिसांनी सूत्रे हलवली आणि रात्री उशिरा आरोपी अयान अहमद याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि आयटी ॲक्ट अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन साक्ष द्यावी, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुमारे सहा ते आठ व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले होते. त्यात हातरून वेगवेगळ्या मुलींची अश्लील वर्तन करताना दिसून आला होता.