Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:36 IST2026-04-14T11:33:24+5:302026-04-14T11:36:03+5:30
५ वर्षांपूर्वी जो भाऊ कायमचा दुरावला होता, तो अचानक वैष्णोदेवी मंदिर परिसरात सापडला.

Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये कोणतीही फिल्मी स्टोरी नाही, तर सख्ख्या भाऊ-बहिणीच्या भेटीची हृदयस्पर्शी गोष्ट आहे, जी पाहून कठोर मनाचा माणूसही गहिवरून जाईल. ५ वर्षांपूर्वी जो भाऊ कायमचा दुरावला होता, तो अचानक वैष्णोदेवी मंदिर परिसरात सापडला.
५ वर्षांपूर्वी कुटुंबातील मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. घरच्यांनी त्याला शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केलं, पोलीस स्टेशनच्या चकरा मारल्या, गल्ली न् गल्ली शोधून काढली, पण त्या मुलाचा कुठेही शोध लागला नाही. हळूहळू वर्षे सरत गेली आणि तो आता कधीच परत येणार नाही, असं लोकांना वाटू लागले. पण म्हणतात ना, बहिणीच्या प्रेमात आणि प्रार्थनेत खूप ताकद असते. बहीण दररोज देवीकडे एकच मागणं मागायची. "माझा भाऊ जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे आणि एकदा तरी त्याची भेट होऊ दे" असं म्हणत होती.
जेव्हा बहीण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मूला पोहोचली होती. भक्तांची अलोट गर्दी, जयघोषाचा आवाज याचं दरम्यान ती मंदिराच्या दिशेने पुढे सरकत होती. तितक्यात 'अर्धकुंवारी'जवळ तिची नजर एका तरुणावर पडली. तो तरुण अत्यंत दयनीय अवस्थेत, फाटलेल्या कपड्यांमध्ये एका भिकाऱ्यासारखा कडेला बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर धूळ आणि काळाचे घाव स्पष्ट दिसत होते. जशी बहिणीची नजर त्या चेहऱ्यावर स्थिरावली, तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा ती जवळ गेली आणि तिने नीट पाहिलं, तेव्हा तिचा थरकाप उडाला... हा तिचा तोच धाकटा भाऊ होता, जो ५ वर्षांपूर्वी हरवला होता.
आपल्या हताश भावाला ओळखताच बहीण हंबरडा फोडून रडू लागली. भावानेही जेव्हा आपल्या बहिणीला पाहिलं, तेव्हा त्याच्याही डोळ्यांतून अश्रू आले. दोघे एकमेकांना मिठी मारून असे रडले की, आसपास उभ्या असलेल्या भाविकांचेही डोळे पाणावले. लोक अवाक झाले होते. आता लोक हा व्हिडीओ शेअर करून लिहित आहेत की, "श्रद्धा खरी होती, साक्षात मातेने 'चमत्कार'च घडवून आणला आहे." हा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे.