चतुर्ग्रही योग: ४ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; अडकलेला पैसा मिळेल, मान-सन्मान-आनंदी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:09 PM2023-10-18T12:09:08+5:302023-10-18T12:21:32+5:30

सूर्य आणि बुधाच्या तूळ प्रवेशानंतर ६ ग्रहांचे अनेक प्रकारचे योग जुळून येत असून, काही राशींना चतुर्ग्रही योग अतिशय फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास ऑक्टोबरचा महिना अनेकार्थाने विशेष ठरत आहे. तूळ राशीत चार ग्रहांचा युती योग जुळून येत आहे. नवरात्रानंतर हा चतुर्ग्रही युती योग जुळून येणार असून, ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत हा योग कायम राहणार आहे. चतुर्ग्रही योगासह अन्यही काही योग जुळून येत आहेत.

तूळ राशीत हा चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. नवरात्रारंभ झाला की, नवग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत विराजमान होत आहे. सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. सूर्याच्या तूळ प्रवेशाने तूळ संक्रांती सुरू होणार असून, १६ नोव्हेंबरपर्यंत सूर्य तूळ राशीत असेल. यानंतर तो वृश्चिक राशीत विराजमान होईल.

सूर्यानंतर लगेचच नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह कन्या राशीत आला होता. अवघ्या काही दिवसाच्या अंतराने बुध तूळ राशीत प्रवेश करत आहे. बुधाच्या तूळ राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि बुधाच्या युतीचा शुभ राजयोग मानला गेलेला बुधादित्य योग जुळून येत आहे.

तूळ राशीत नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह विराजमान आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तूळ राशीत आला होता. यातच छाया क्रूर ग्रह मानला गेलेला केतु ग्रह तूळ राशीत आहे. त्यामुळे तूळ राशीत सूर्य, बुध, मंगळ आणि केतु यांचा चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. यातील काही योग शुभ मानले जातात, तर काही प्रतिकूल मानले जातात. ४ राशीच्या व्यक्तींना तूळ राशीतील चतुर्ग्रही योग अतिशय शुभ लाभदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? पाहुया...

मेष राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग शुभ ठरू शकेल. सौभाग्य प्राप्त होईल. व्यावसायिकांना दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले मोठे पेमेंट मिळाल्यावर अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू केल्या जाऊ शकतात. कामाच्या ठिकाणचे वातावरण खूप सकारात्मक असेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकेल. अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सदस्यांसह संबंध लक्षणीय सुधारतील. जोडीदाराचा सल्ला घेऊन व्यवसायात जे काही काम कराल त्यात यश मिळेल. महिन्याच्या शेवटी कोणत्याही बाबतीत अतिउत्तेजित, आक्रमक होऊ नका, असा सल्ला दिला जातो. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग फायदेशीर ठरू शकेल. खूप शुभ प्रभाव पडू शकेल. आर्थिक लाभासोबतच कामाच्या ठिकाणीही प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. व्यवसायात मित्रांकडून मोठी मदत मिळेल. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न केल्यास सर्व कामे सहज पूर्ण होतील. करिअरबद्दल बोलायचे झाले तर चांगली नोकरीची ऑफर येऊ शकते.

मकर राशीच्या व्यक्तींना चतुर्ग्रही योग सकारात्मक असेल. धार्मिक कार्याची आवड वाढू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कार्यालयीन कामात मान-सन्मान मिळेल. नोकरीत अपेक्षित परिणाम मिळतील. व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसा मिळाल्याने समाधानी असाल. कुटुंबात सर्व काही चांगले होईल. मात्र, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

विशेष म्हणजे तूळ राशीतील सूर्य, बुध, मंगळ आणि केतु हे राहु आणि गुरु या ग्रहांपासून समसप्तक स्थानी असून, या सहा ग्रहांचा समसप्तक योग जुळून येत आहे. राहु आणि गुरु मेष राशीत आहे. मेष राशीतील गुरु आणि राहुचा गुरु चांडाळ योग तसेच तूळ राशीत मंगळ आणि केतुचा युती योग अतिशय प्रतिकूल मानले गेले आहेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.