अखेर तो दिवस आलाच! 'या' तारखेला सुरू होणार Tesla चे भारतातील पहिले शोरुम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:48 IST2025-07-11T12:43:45+5:302025-07-11T12:48:27+5:30
Tesla India Entry: मुंबईत सुरू होणार Tesla चे पहिले शोरुम; कोणती कार लॉन्च होणार? जाणून घ्या...

Tesla India Operation: अनेक वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनी Tesla चे भारतात येत्या तीन दिवसांत शोरुम सुरू होत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतातील टेस्लाचे पहिला शोरुम १५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे सुरू होईल. या शोरुमच्या उद्घाटनासह, टेस्लाचा दक्षिण आशियात औपचारिक प्रवेश होईल. सुमारे ४००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या पहिल्या टेस्ला शोरुमधून भारतातील कामकाज सुरू होईल.
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील शोरुमचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. हे शोरुम ग्राहकांसाठी टेस्लाचे 'एक्सपेरिएन्स सेंटर' म्हणून काम करेल, ज्यामध्ये ग्राहकांना टेस्लाच्या गाड्या जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. टेस्ला भारतात डायरेक्ट-टू-कस्टमर रिटेल मॉडेलसह वाहनांची विक्री करेल.
मुंबईनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये टेस्लाचे पुढील शोरुम उघडणार आहे. अलीकडेच टेस्लाने मुंबई आणि पुण्यात विविध पदांसाठी रिक्त जागा (टेस्ला जॉब्स इन इंडिया) जाहीर केल्या होत्या. यामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, सप्लाय चेन, इंजिनिअरिंग आणि आयटी, ऑपरेशन बिझनेस सपोर्ट, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, एआय आणि रोबोटिक्स, सेल्स आणि कस्टमर सपोर्टसारख्या विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज मागवण्यात आले होते.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, टेस्ला कारची पहिली खेप भारतात पोहोचली आहे. चीनमध्ये तयार झालेली टेस्लाची प्रसिद्ध इलेक्ट्रिक एसयूव्ही - मॉडेल वाय(Model Y) रियर-व्हील ड्राइव्ह भारतात पाठवण्यात आली आहे.
कंपनीने चीनमधील शांघाय येथून या कारचे एकूण 5 युनिट भारतात आयात केले आहेत. मॉडेल वाय ही जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कारपैकी एक असून, कंपनी या कारसह भारतात आपला प्रवास सुरू करू शकते.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला सध्या युरोपियन आणि चिनी बाजारपेठेत विक्रीत मोठी घसरण अनुभवत आहे. म्हणूनच टेस्ला जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारपेठेत, म्हणजेच भारतात लवकरात लवकर प्रवेश करण्याची योजना आखत आहे.
किंमत काय असेल? अधिकृत लाँचिंगपूर्वी टेस्लाच्या पहिल्या कारच्या किंमतीबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. परंतु ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की, या आयात केलेल्या कारच्या प्रत्येक मॉडेलची किंमत २७.७ लाख रुपये (सुमारे $३१,९८८) असू शकते. पण, त्यावर २१ लाख रुपयांपेक्षा जास्त आयात शुल्कही लावला जाईल.
टेस्ला भारतात प्लांट उभारेल का? सध्या टेस्लाचा भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यात रस नाही. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी गेल्या महिन्यात माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, टेस्लाचे प्राधान्य भारतातील त्यांच्या शोरुमचा विस्तार करणे आहे. टेस्लाने भारतात प्लांट उभारण्यात फारसा रस दाखवला नाही.