जबरदस्त! Tata Punch आता EV व्हर्जनमध्येही येणार? कंपनीचे सूचक विधान; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 05:20 PM2021-10-05T17:20:56+5:302021-10-05T17:26:06+5:30

TATA Motors ने Tata Punch SUV च्या EV व्हर्जनबाबत महत्त्वाचे आणि सूचक विधान केले आहे.

अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि चर्चांनंतर TATA मोटर्सने आपली सर्वात छोटी आणि बहुप्रतिक्षित एसयूव्ही Tata Punch सादर केली. यासह टाटाने २१ हजारांपासून या कारच्या बुकिंगलाही सुरुवात केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून, जगभरातील बड्या कंपन्या आपल्या कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपली सर्वच उत्पादन इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर करणार असल्याचे घोषित केले आहे.

देशात आताच्या घडीला EV सेगमेंटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवत असलेल्या TATA मोटर्सच्या Tata Nexon, Tata Tigor या कारची इलेक्ट्रिक व्हर्जन प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. याशिवाय आतापर्यंतच्या इलेक्ट्रिक सेगमेंट सेलमध्ये TATA नेच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.

यातच आता TATA ने Tata Punch SUV च्या EV व्हर्जनबाबत महत्त्वाचे आणि सूचक विधान केले आहे. कंपनीने टाटा पंचला आपल्या अल्फा आर्किटेक्चरवर विकसित केले आहे. आम्ही या प्लॅटफॉर्मवर बांधलेल्या Nexon आणि Tigor ला यापूर्वीच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित केले आहे. त्यामुळे Tata Punch लाही इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्याची क्षमता आहे, असे कंपनीचे उपाध्यक्ष (प्रॉडक्ट लाइन) आनंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Tata Punch च्या EV मॉडेलबाबत विचारले असता, आनंद कुलकर्णी म्हणाले की, कंपनीला अजूनही Tata Punch ला बाजारात कसा प्रतिसाद मिळतो, हे बघायचे आहे. देशात इलेक्ट्रिक कार सेगमेंटचा कसा विस्तार होतो, हेही कंपनी बघेल, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

दुसरीकडे, आकर्षक लूक आणि मजबूत इंजिन क्षमतेने सजलेल्या माईक्रो एसयूव्ही Tata Punch साठी अधिकृत बुकिंगही सुरू असून, कंपनीच्या वेबसाईट किंवा डीलरशिप्समधून २१,००० रुपये भरून बुक करू शकतात.

Tata Punch ही मायक्रो एसयूव्ही Pure, Adventure, Accomplished आणि Creative अशा एकूण चार व्हेरिअंट्समध्ये आली आहे. याच्या बेसिक व्हेरिअंट्सला वगळता सर्व व्हेरिअंट्समध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

Tata Punch ऑर्कस व्हाईट, Atomic Orange, Daytona Grey, Meteor Brown, Calypso Red, Tropical Mist आणि Tornado Blue अशा ७ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Tata Punch ला विद्यमान १.२-लीटर, ३-सिलेंडर, रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, ५-स्पीड मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. याशिवाय, TATA मोटर्स कमी किंमतीमध्ये शानदार फीचर्स या एसयूव्हीमध्ये देत आहे.

Tata Punch मध्ये ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, आयआरए कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, स्वयंचलित एसी, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, तसेच २७ कनेक्टेड फीचर्स देण्यात येणार आहेत.

याशिवाय रिवर्स कॅमेरा, क्रूज कंट्रोल ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर्स आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टिम, एबीएस, ईबीडीसह दोन एअरबॅग, ISOFIX एंकर, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेक स्वे कंट्रोल, टायर पंक्चर रिपेयर किट असे अनेक फीचर्सही यामध्ये आहेत.