TATA ची भन्नाट भरारी! EV सेगमेंटमध्ये आघाडी कायम; कार विक्रीत तब्बल ३२४ टक्क्यांची मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:33 PM2021-12-02T19:33:24+5:302021-12-02T19:39:09+5:30

सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा असूनही, TATA ने दमदार कामगिरी करत इलेक्ट्रिक कार विक्रीमधील आघाडी कायम ठेवली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ऑटोमोबाइल सेक्टर सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्यामुळे वेगळ्या संकटाला तोंड देत आहे. यामुळे इच्छा आणि क्षमता असूनही ग्राहकांना वाहनांची डिलिव्हरी देण्यास कंपन्यांना विलंब होत आहे.

अगदी महिंद्रा, मारुतीपासून ते TATA पर्यंत सगळ्याच कंपन्या सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अडचणीत आल्या आहेत. मात्र, तरीही TATA च्या ग्रुपच्या Tata Motors कंपनीने दमदार कामगिरी केली आहे.

Tata मोटर्स नोव्हेंबर २०२१ मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण २९,७७८ प्रवासी वाहनांची विक्री करून ३८ टक्के वाढ नोंदवली आहे. तर, इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आघाडी कायम ठेवली असून, टाटा मोटर्स कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तब्बल ३२४ टक्क्यांनी वाढली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत Tata च्या प्रवासी वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ३८ टक्क्यांनी वाढली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये देशांतर्गत बाजारात टाटाने एकूण २१ हजार ६४१ कार विकल्या होत्या. परंतु, दर महिन्याच्या आधारावर विक्रीत थोडी घट झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये Tata मोटर्स कंपनीने एकूण ३३ हजार ९२५ प्रवासी वाहनांची विक्री केली होती. दुसरीकडे, टाटाच्या इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा भारतीय बाजारपेठेत आघाडीवर आहे. टाटाच्या इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीमध्ये वार्षिक आधारावर ३२४ टक्के वाढ झाली आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये Tata मोटर्सने केवळ ४१३ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. तर गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये कंपनीने एकूण १,७५१ इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. विक्रीचा हा आकडा कमी वाटत असला तरी ईव्ही मार्केटमध्ये टाटा अव्वल असून वार्षिक आधारावर ३२४ टक्के वाढ नोंदवली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये टाटाने १,५८६ इलेक्ट्रिक कार विकल्या होत्या. तर सप्टेंबर महिन्यात कंपनीने १,०८७ इलेक्ट्रिक कारची विक्री केली होती. Tata Nexon EV इलेक्ट्रिकला भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे.

याशिवाय टाटा टिगोर ईव्हीची (Tata Tigor EV) मागणीही वाढत आहे. पण दोन्हीपैकी कोणत्या कारची किती विक्री झालीय याबाबत मात्र माहिती कंपनीने दिलेली नाही. तथापि, लाँच झाल्यापासूनच Nexon EV ही भारतातील बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार आहे.

एकूण देशांतर्गत विक्रीमध्येही वार्षिक आधारावर नोव्हेंबर महिन्यात टाटा वाहनांच्या विक्रीत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये एकूण ४७,८५९ वाहनांची विक्री झाली होती. गेल्या महिन्यात एकूण ५८,०७३ वाहनांची विक्री झाली.

विशेष म्हणजे चिपच्या संकटामुळे सर्वच कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम झाला असतानाही टाटाची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. दरम्यान, सेमीकंडक्टर क्षेत्रातही चीनची मक्तेदारी आहे. याच क्षेत्रात आता TATA ने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

TATA ग्रुपची आउटसोर्स्ड सेमीकडंक्टर असेंबली प्रकल्पासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच या राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.

रॉयटर्सनुसार, टाटा ग्रुप सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्पाबाबत पुढील महिन्यात सर्व गोष्टी अंतिम करू शकतो. TATA ग्रुप सॉफ्टवेअरच्या बाबतीत अद्ययावत, अग्रेसर आणि मजबूत असून, आता हार्डवेअरच्या बाबतीतही टाटा समूहाला मजबूत व्हायचे आहे, असे सांगितले जात आहे.

TATA ग्रुप यासाठी इंटेल, एएमडी आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्याशी करार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती. सेमीकंडक्टर म्हणजे एक प्रकारच्या सिलिकॉन चिप्स आहेत.