१५ जुलैपासून पुन्हा सुरू होणार 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; मोठ्या मागणीमुळे करण्यात आलेलं बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 01:09 PM2021-07-13T13:09:05+5:302021-07-13T13:14:32+5:30

Electric Bike : देशात सध्या अनेकांचा कल हा इलेक्ट्रीक बाईक्सकडे वाढताना दिसत आहे. मोठी मागणी असलेल्या या बाईकचं पुन्हा सुरू होणार बुकिंग.

देशातील प्रमुख इलेक्ट्रीक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी Revolt Motors नं पुन्हा एकदा आपली लोकप्रिय बाईक RV400 चं बुकिंग सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या बाईकचं बुकिंग १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू करण्यात येईल. दुसऱ्यांदा कंपनीनं सहा शहरांसाठी बाईकचं बुकिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या महिन्यात कंपनीनं मुंबई, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांसाठी आपल्या या बाईकचं बुकिंग सुरू केलं होतं.

तसंच ग्राहकांनी देखील याला उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यानंतर केवळ दोन तासांत या बाईकचं बुकिंग बंद करावं लागलं होतं.

स्टायलिश डिझाईन आणि जबरदस्त रेंज असलेल्या Revolt च्या Electric Bike ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच Revolt Motors नं नव्या ट्रॅकिंग सिस्टम VOLT ची घोषणा केली आहे.

या सिस्टमच्या मदतीनं ग्राहकांना बाईकच्या डिलिव्हरीची स्थिती ट्रॅक करण्यास मदत मिळणार आहे. तर व्हेईकल ऑनलाईन ट्रॅकिंग सिस्टम (VOLT) ग्राहकांना आपल्या बाईकच्या बुकिंगपासून प्रोडक्शन आणि डिलिव्हरीबाबत सर्व सूचना देणार आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांच्या बुकिंग आयडी किंवा मोबाईल नंबरवरील 'ट्रॅक युवर रिव्होल्ट' बटणावर क्लिक करून ही प्रणाली वापरली जाऊ शकते.

बाईकची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी वेगाने उत्पादन क्षमता वाढविण्यावरही काम करण्यात येत असल्याची माहिती रिवोल्टकडून देण्यात आली होती.

रिव्होल्टने आपल्या तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ही प्रणाली सध्या केवळ ई-कॉमर्स दिग्गजांकडे उपलब्ध आहे.

उत्तम प्रणालीमुळे ऑटोमोबाईल उद्योगात या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल ज्याच्या माध्यमातून बाईकच्या डिलिव्हरीवर पूर्ण प्रकारे नजर ठेवण्यात येईल.

यापूर्वी कंपनीनं सुरू केलेल्या सेलमध्ये ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. www.revoltmotors.com या वेबसाईटवर या बाईकचं बुकिंग पुन्हा सुरू केलं होतं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार केवळ दोन तासांमध्ये या बाईकच्या सर्व युनिट्सची विक्री झाली आणि बुकिंग पुन्हा बंद करावं लागलं होतं.

या सेलमध्ये 50 कोटी रूपयांच्या Revolt RV400 इलेक्ट्रिक बाईक्सच्या युनिट्सची विक्री झाली. दरम्यान, लवकरच पुन्हा बुकिंग सुरू केलं जाणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आहे.

ज्या ग्राहकांनी ही बाईक यापूर्वीच बाईक बुक केली होती, त्यांना सप्टेंबर महिन्यात गाडीची डिलिव्हरी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारनं FAME II या स्कीमअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ केली होती. त्यानंतर Revolt RV400 या बाईकची किंमत मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली होती.

कंपनीनं Revolt RV400 या बाईकच्या किंमतीत 28 हजारांपर्यंतची कपात केली होती. किंमतीत कपात केल्यानंतर या बाईकची एक्स शोरूम किंमत ही 90,799 रूपये झाली आहे. यापूर्वी या बाईकची किंमत 1.19 लाख रूपये एक्स शोरूम इतकी होती.