MG Comet EV: लवकरच लॉन्च होणार स्वस्त EV कार; 300Km रेंज आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 05:25 PM2023-03-10T17:25:58+5:302023-03-10T17:30:50+5:30

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. यामुळेच कंपन्या नवनवीन गाड्या लॉन्च करत आहे.

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहेत. याचाच फायदा घेत अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रीक गाड्या मार्केटमध्ये आणत आहे. या यादीत आता नवीन गाडीचे नाव जोडले जाणार आहे. मॉरिस गॅरेज (MG Motors) लवकरच MG Comet नावाची एक इलेक्ट्रीक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एप्रिल महिन्यात ही कार लॉन्च होऊ शकते.

अद्याप याच्या लॉन्चिंगची तारीख समोर आलेली नाही. पण, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले आहे की, कंपनी 2023 च्या दुसऱ्या तिमाहीनंतर आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी असेल MG Comet EV...

कंपनीने काही दिवसांपूर्वी या इलेक्ट्रिक कारचे काही फोटोही शेअर केले होते. कारच्या बाहेरील बाजूस MG ब्रँडिंग मिळेल आणि त्या खालीच गाडीचे चार्जिंग पोर्ट असेल. ड्युअल-टोन बंपरच्या खालच्या बाजूला ड्युअल व्हर्टिकल स्टॅक्ट हेडलॅम्प, इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटरसह एलईडी डीआरएल, एक एलईडी लाइट बार आणि विंडस्क्रीनच्या खाली एक क्रोम स्ट्रिप मिळेल. कारमध्ये व्हील कव्हर्ससह स्टीलची चाके आणि उच्च-माऊंट स्टॉप लॅम्पदेखील मिळेल.

रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही कार एकूण पाच रंगांमध्ये सादर करेल. यामध्ये पांढरा, निळा, पिवळा, गुलाबी आणि हिरवा रंगांचा समावेश आहे. कंपनीने अद्याप कारचे फीचर्स आणि इतर तांत्रिक माहिती दिलेली नाही. परंतु कंपनीच्या सध्याच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये ही एंट्री-लेव्हल कार असल्याने याची ड्रायव्हिंग रेंज Zs EV पेक्षा कमी असेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या कारमध्ये 20-25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देऊ शकते. ही बॅटरी Tata Autocop कडून घेतली जाईल. या बॅटरीवर ही कार एका चार्जमध्ये 200 ते 300 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. यामध्ये कंपनी सिंगल फ्रंट एक्सल मोटर देईल जी 68hp ची पॉवर जनरेट करू शकते.

कारमध्ये 10.25-इंच स्क्रीन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ड्युअल-टोन इंटीरियर, व्हॉईस कमांड, वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारखे फीचर्स असू शकतात. एवढंच नाही तर या छोट्या कारमध्ये सनरूफही दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतचा संपूर्ण तपशील येत्या काळात समोर येईल. रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही कार वर्षाच्या मध्यात लॉन्च करू शकते आणि याची किंमत 10 लाख रुपयांच्या आत ठेवण्याची शक्यता आहे.