"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा

Hardik Pandya reaction, IPL 2024 MI vs KKR:मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हे हार्दिकचे पहिलेच वर्ष असून MI आता स्पर्धेबाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे

Hardik Pandya reaction, IPL 2024 Mumbai Indians vs KKR: मुंबई इंडियन्सच्या संघाला कोलकाता नाईट रायडर्सने २४ धावांनी पराभव केला. १७० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा डाव १४५ धावांतच आटोपला. कोलकाताच्या भेदक माऱ्यापुढे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातले.

मुंबईला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पद्धतीचा पराभव स्वीकारावा लागला. मुंबईतील वानखेडे मैदानावर तब्बल १२ वर्षांनंतर कोलकाताच्या संघाने मुंबईला पराभवाची धूळ चारली. या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या काय म्हणाला, वाचा...

हार्दिक म्हणाला, "आजच्या सामन्यात आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. माझ्या अंदाजानुसार खेळपट्टी हळूहळू गोलंदाजांना मदत करण्यासाठी पोषक झाली होती. दुसऱ्या डावात दवदेखील पडलं होतं. पण आमच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही."

"ड्रेसिंग रुममध्ये गेल्यावर या सामन्याचा पुन्हा एकदा नीट विचार करावा लागेल आणि कुठे-कुठे सुधारणा करता येईल याबद्दल चर्चा करावी लागेल. सतत संघर्ष करावा लागेल हे मी स्वत:ला कायम सांगत असतो. सध्याची स्थिती आव्हानात्मक आहे. पण मी ते आव्हान स्वीकारले आहे."

"साहजिकपणे आमचे फलंदाज आज मोठी भागीदारी करू शकले नसल्याने हा पराभव झाला. आम्ही सातत्याने विकेट्स गमावत राहिल्याचा आम्हाला फटका बसला. सध्या असे अनेक प्रश्न समोर आहेत त्याचं उत्तर शोधावं लागेल. काही प्रश्नांची उत्तरे मिळायला भरपूर वेळदेखील लागेल. पण सध्या तरी काय बोलावं हे सुचत नाहीये," अशी प्रतिक्रिया हार्दिकने दिली.