Grand Vitara CNG: मारुतीने जबरा युक्ती लढविली! नवी ग्रँड व्हिटारा सीएनजीमध्ये, पण सिलिंडरच दिसत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 10:16 AM2023-01-07T10:16:53+5:302023-01-07T10:22:47+5:30

सीएनजी कार घेतली की साहित्य ठेवायला बुट स्पेसच मिळत नसायची. यामुळे अनेक ग्राहक सीएनजी कार घेत नव्हते. मारुतीने जबरदस्त युक्ती लढविली आहे.

सध्या सीएनजी आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही फरक राहिलेला नसला तरी मायलेजमध्ये सीएनजी कारच सर्वात पुढे आहेत. असे असताना लोक सीएनजीऐवजी पेट्रोल किंवा डिझेल कार घेत होते. गेल्या काही महिन्यांत दरवाढीमुळे सीएनजी कारची विक्री थंडावली होती. सीएनजी कार घेतली की साहित्य ठेवायला बुट स्पेसच मिळत नसायची. यामुळे अनेक ग्राहक सीएनजी कार घेत नव्हते. मारुतीने जबरदस्त युक्ती लढविली आहे.

मारुती सुझुकीने नव्या Grand Vitara ला सीएनजीमध्ये लाँच केले आहे. या एसयुव्ही कारचा आकर्षक लूक, फिचर्स तर आहेतच परंतू मागच्या डिक्कीमध्ये सीएनजीचा सिलिंडरच दिसत नाहीय.

Grand Vitara सीएनजीची किंमत 12.85 लाख आणि 14.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवण्यात आली आहे. आता लोकांना एसयुव्हीपण, बुटस्पेसपण आणि सीएनजीपण एकाच पॅकेजमध्ये मिळणार आहे.

नव्या Maruti Grand Vitara CNG मध्ये कंपनीने 1.5 लिटर क्षमतेचे नॅच्युरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन वापरले आहे. हे इंजिन 103bhp एवढी पॉवर आणि 136Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच सीएनजी मोडमध्ये याचे पॉवर आउटपुट थोडे कमी होते आणि CNG मोडवर हे इंजिन 87bhp एवढी पॉवर आणि 121.5Nm चा टॉर्क जनरेट करते.

या एसयूव्हीमध्ये केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन इंजिनचाच पर्याय उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणज, या कारचे सीएनजी व्हर्जन 26.6 किलोमीटर प्रति किलोग्राम पर्यंत मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

नवीन ग्रँड विटारा पेट्रोल इंजिन तसेच हायब्रीड प्रकारात उपलब्ध आहे. माईल्ड-हायब्रिड प्रकार 19 ते 21 kmpl आणि स्ट्राँग हायब्रिड प्रकार 27.97kmpl पर्यंत मायलेज देतो.

कंपनीने ही SUV फ्युचरिस्टिक डिझाइन लँग्वेजवर तयार केली आहे. यात डेटाइम रनिंग लाइट्स (DRL's) सह प्रोजेक्टर हेडलॅम्प मिळतात. याशिवाय, कंपनीने मल्टी-स्क्रीन पेट्रोल/सीएनजी मोड दिला आहे, याशिवाय, ड्रायव्हर पेट्रोल/सीएनजी मोड बदलण्यासाठी स्विच देखील वापरू शकतो.

सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रँड विटारामध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसह (EBD) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर्ससरखे फीचर्स देण्यात आले आहेत.

'NEXtre' सिग्नेचर डिझाइनचा टेल लॅम्प एसयूव्हीच्या मागील बाजूस देण्यात आला आहे. खास एसयूव्ही स्टॅन्समुळे ग्रँड विटारा तरुणांच्या पसंतीस पडेल असा कंपनीचा दावा आहे. यात १७ इंच ड्युअल टोन प्रिसिजन कट अलॉय व्हील्स पाहायला मिळतात.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा मध्ये, कंपनीने CNG सिलेंडर बॉडीच्या खाली ठेवला आहे, जो पुढील आणि मागील रांगेत दिलेल्या सीटच्या खाली येतो. तुम्हाला त्याच्या बूटमध्ये म्हणजे डिक्कीमध्ये पुरेशी जागा मिळते. सीएनजी वाहनधारकांची मोठी तक्रार कंपनीने सोडविली आहे.