वाळूच्या टिप्परने सरपंचांच्या पतीला चिरडले; ग्रामस्थांनी जाळले टिप्पर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 00:17 IST2026-05-13T00:16:43+5:302026-05-13T00:17:44+5:30
परभणी : पूर्णा तालुक्यातील संदलापूर येथील वाळू घाटावरून वाळू भरून भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्परने गावात येताच सरपंच रुक्मीणबाई यांचे ...

वाळूच्या टिप्परने सरपंचांच्या पतीला चिरडले; ग्रामस्थांनी जाळले टिप्पर
परभणी: पूर्णा तालुक्यातील संदलापूर येथील वाळू घाटावरून वाळू भरून भरधाव वेगात जाणाऱ्या टिप्परने गावात येताच सरपंच रुक्मीणबाई यांचे पती पंडित मात्रे यांना चिरडल्याची घटना १२ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी टिप्पर पेटवून दिला.
संदलापूर घाटातून नजीकचेच गाव असलेल्या सुकी येथील टिप्पर क्रमांक एमएच ४३ यू २८५० हा वाळू नेण्यासाठी आला होता. वाळू भरून घेऊन जाताना संदलापूर गावात एका दुकानावरून सामान घेऊन घराकडे पायी निघालेल्या पंडित मात्रे (वय ५५) यांच्या अंगावरून टिप्पर गेला. यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्रे यांची ही अवस्था पाहिल्यानंतर ग्रामस्थांच्या संतापाचा अनावर झाला. त्यांनी या टिप्परला आग लावून टाकली. टिप्पर जागेवरच खाक झाला, तर टिप्परचा चालक योगेश भागवत काळबांडे (वय २२, रा.सुकी) याला बदडून ताब्यात घेतले. या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्यासह पोलिस फौजफाटा गावात दाखल झाला. मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसाठी आणण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
वेगाच्या नियंत्रणासाठी मात्रे यांनी दिली होती समज
या गावातून नेहमीच वाळूची वाहतूक ट्रक आणि मोठ्या वाहनाद्वारे होत होती. वाहनांच्या भरधाव वेगामुळे अपघाताची भीती असल्याने पंडितराव मात्रे यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी गावातून वाळूची वाहने सावकाश जाऊ द्या, या कारणावरून वाळू माफियांना समज दिली होती. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने मात्रे यांचाच बळी गेला.
चालकाला ताब्यात देण्यास ग्रामस्थांनी केला विरोध
घटनेनंतर अपघातास कारणीभूत ठरलेल्या टिप्पर चालकास ग्रामस्थांनी ताब्यात घेतले. महिला व पुरुष रस्त्यावर उतरले होते. पोलिस आल्यानंतरही ते त्या चालकास ताब्यात द्यायला तयार नव्हते. या प्रकरणात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त करीत संताप व्यक्त करीत होते. पोलिसांनी त्यांना समजावत शेवटी आरोपी चालकास ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पोलिसांनी अधिकची कुमक मागविल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. आरोपी हा सुकीच्या उपसरपंचाचा मुलगा असल्याचे सांगण्यात आले.