भरारी पथकातील दोन तलाठ्यांना वाळू माफियांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 07:17 PM2020-06-05T19:17:45+5:302020-06-05T19:18:13+5:30

सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sand mafias beat up two talathi in Bharari squad | भरारी पथकातील दोन तलाठ्यांना वाळू माफियांची मारहाण

भरारी पथकातील दोन तलाठ्यांना वाळू माफियांची मारहाण

Next

गंगाखेड: अवैध वाळू उपसाकरून त्याची वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांनी अवैध गौण खनिज वाहतूक भरारी पथकातील दोन तलाठ्यांना मारहाण केल्याची घटना दि. ४ जून गुरुवार रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास महातपुरी येथे घडली. याप्रकरणी धारासुर सज्जाचे तलाठी अक्षय नेमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाखेड तालुक्यातुन वाहत असलेल्या गोदावरी नदी पात्रातील वाळू चोरी करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात ही वाळू माफिया चांगलेच सरसावले असल्याचे गेल्या काही दिवसांत गंगाखेड तालुक्यातील मसला, नागठाणा, गौंडगाव, गंगाखेड शहर, महातपुरी, खरबडा आदी ठिकाणी महसूल व पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीतुन समोर आले आहे. दि. ४ जून गुरुवार रोजी महातपुरी येथून अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये वाळू वाहतुक केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावरून रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास महातपुरी येथे पोहचलेल्या तहसीलदार स्वरूप कंकाळ व अवैध गौण खनिज वाहतूक भरारी पथकातील तलाठी अक्षय नेमाडे, रुपेश मुलंगे यांनी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास महातपुरी गायरान परिसरात वाळू भरून जाणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पकडला. 

यादरम्यान  ट्रॅक्टर चालक गुलाब विनायक चव्हाण याने फोन लावताच दोन दुचाकीवर ( एमएच २२ एएच ०२१६ ) व (एमएच २२ एजी ८२१७ )  आलेल्या पाच जणांनी अक्षय नेमाडे व रुपेश मुलंगे या दोन्ही तलाठ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. अक्षय नेमाडे यांच्या जवळील मोबाईल ही हिसकावून घेतला. याच वेळी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी रुपेश मुलंगे यांच्या मोबाईलवर फोन केल्याने घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला घटनास्थळापासून काही अंतरावर असलेले तहसीलदार स्वरूप कंकाळ हे जवळ येताच मारहाण करणारे दुचाकीवरून पळून जात असताना दोन तलाठ्यांनी दोघांना पकडून ठेवले तर वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळून जाणाऱ्या चालकाला तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी पाठलाग करून अडविले. तेंव्हा चालक गुलाब विनायक चव्हाण हा ट्रॅक्टर जागीच सोडून पळून गेला. 

काही वेळाने घटनास्थळी पोहचलेल्या सोनपेठ पोलीसांच्या मदतीने तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या भरारी पथकाने पकडलेला ट्रॅक्टर सोनपेठ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. याप्रकरणी तलाठी अक्षय मधुकर नेमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. ५ जून शुक्रवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर चालक गुलाब विनायक चव्हाण, रामकीशन कडाजी दंडवते, नागोराव कडाजी दंडवते व अन्य तिघे अशा सहा जणांवर तलाठ्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा तसेच वाळू चोरी केल्याच्या कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, साथरोग प्रतिबंध कायदा आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने हे करीत आहे.

Web Title: Sand mafias beat up two talathi in Bharari squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.