पैशांच्या वादातून तरुणाची हत्या करणाऱ्या एकास जन्मठेप, दुसऱ्यास १४ वर्ष सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:49 IST2026-05-07T19:48:59+5:302026-05-07T19:49:59+5:30
परभणी सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा; नऊ साक्षीदारांची साक्ष ठरली महत्त्वाची

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या करणाऱ्या एकास जन्मठेप, दुसऱ्यास १४ वर्ष सक्तमजुरी
- राजन मंगरुळकर
परभणी : जिंतूर शहरात मे २०२४ मध्ये झालेल्या खून प्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश- १ एन.आर.नाईकवाडे यांनी दोन जणांना दोषी ठरविले. यामध्ये एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तर दुसऱ्या आरोपीस घटनेत मदत केल्याने दोषी ठरवून १४ वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अलीम कुरेशी मुसा कुरेशी (२८, रा.कुरेशी मोहल्ला, जिंतूर) यास जन्मठेपेची शिक्षा तर अमजत सरवर कुरेशी (२४, रा.फतन प्लॉट, बेलदार नगर, जिंतूर) यास घटनेत उत्तजन करुन मदत केल्याने १४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याप्रकरणी तय्यब कुरेशी खाजा कुरेशी (रा.साठे नगर, जिंतूर) यांनी १४ मे २०२४ रोजी घडलेल्या घटनेची फिर्याद दिली होती. या घटनेत फिर्यादींचा मुलगा शगननूर कुरेशी यास नॅशनल उर्दू शाळेजवळ असताना अलीम कुरेशी मुसा कुरेशी आणि अमजत सरवर कुरेशी यांनी आरोपीने पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून चाकूने मारले. यानंतर जखमी शगननूर यास जिंतूर सरकारी दवाखान्यात नेले होते.
प्राथमिक उपचारानंतर परभणी सरकारी दवाखान्यात नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.जे.सय्यद यांनी आरोपींना अटक केली. त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे आरोपी कारागृह बंदी होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एन.आर.नाईकवाडे यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी नऊ साक्षीदार तपासले व बाजू मांडली. दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर गुरुवारी न्यायाधीश एन.आर.नाईकवाडे यांनी आरोपींना ही शिक्षा सुनावली. मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनात आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, आकाश रेड्डी, वंदना आदोडे, सय्यद रहिम यांनी काम पाहिले.