अकरा लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गहू, तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:30+5:302021-05-06T04:18:30+5:30

कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात आर्थिक सहाय्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अंत्योदय अन्न योजना ...

Eleven lakh beneficiaries will get free wheat and rice | अकरा लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गहू, तांदूळ

अकरा लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गहू, तांदूळ

googlenewsNext

कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, या काळात आर्थिक सहाय्य राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेचे ४२ हजार ४३ कार्डधारकांना ९ हजार ६२० क्विंटल गहू आणि ४ हजार ९२७ क्विंटल तांदूळ प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे प्राधान्य कुटुंब योजनेतील ९ लाख ७६ हजार २२५ लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे एकूण ३० हजार ७९१ क्विंटल गहू आणि १७ हजार ९७७ क्विंटल तांदूळ जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. हे धान्य लाभार्थ्यांना मोफत वितरित केले जाणार आहे.

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मे आणि जून या दोन महिन्यांत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या धान्याव्यतिरिक्त दोन्ही योजनेतील ११ लाख ७६ हजार ९१९ सदस्यांना ८१ हजार ३१७ क्विंटल गहू आणि ५० हजार ८८३ क्विंटल तांदूळ प्रति सदस्य प्रतिमाह पाच किलो याप्रमाणे मोफत वितरित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे स्थलांतरित लाभार्थ्यांनादेखील पोर्टेबिलिटी योजनेचा लाभ घेत अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

दुकानदारांचा अंगठा लावून धान्याचे वितरण

ई-पॉस मशीनला लाभार्थ्याचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाते; मात्र प्रत्येक लाभार्थ्याचा अंगठा घेतल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ दुकानदारांचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली.

Web Title: Eleven lakh beneficiaries will get free wheat and rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.