कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:59 IST2026-04-15T07:58:56+5:302026-04-15T07:59:22+5:30
Mumbai Crime News: गोरेगावमधील नेस्को संकुलात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी आणखी आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
मुंबई - गोरेगावमधील नेस्को संकुलात लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी आणखी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. कॉन्सर्टमधील विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरविणाऱ्याला कल्याणमधून मंगळवारी अटक करण्यात आली. आनंद पटेल असे त्याचे नाव असून, त्याच्या साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी नेस्को सेंटरच्या इव्हेंट आणि एक्झिबिशनचे उपाध्यक्ष सनी जैन, मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बाळकृष्ण कुरुप, आयोजक कंपनीचे विहान उर्फ आकाश सामल यांच्यासह विद्यार्थी रौनक खंडेलवाल, प्रतीक पांडे यांना अटक केली आहे. खंडेलवाल आणि पांडे यांच्या चौकशीतून आनंद पटेलचे नाव समोर आले. त्यानुसार, कल्याण खडकपाडा पोलिसांच्या मदतीने वनराई पोलिसांनी त्याला अटक केली. तो कल्याणच्या वायले नगर परिसरातील मोहन हाइट्स इमारतीच्या बी विंगमधील ९०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहायचा. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्यासह सर्व आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोठडीत सर्वांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्या जबाबातून अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या ड्रग्जचा झाला वापर...
आनंदने आशिष नावाच्या व्यक्तीकडून ‘एक्स्टॅसी’ (एमडीएमए) या ड्रग्जच्या गोळ्या पुरविल्याचे समोर आले आहे. त्यानुसार, पोलिस यामागच्या म्होरक्यासह अन्य साथीदारांचा शोध घेत आहे. पटेलची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे. तसेच त्याने एकूण किती आणि कुणाला पुरवठा केला, याचा तपास सुरू आहे.
‘त्या’ तरुणीची प्रकृती स्थिर
मृतांपैकी तरुणी लखनौची तर तरूण दिल्लीतील रहिवासी असल्याचे समजते. उपचार घेत असलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर असून, तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
कॉन्सर्टला गेला होता २५ तरुण-तरुणींचा ग्रुप
जमुनालाल महाविद्यालयात शिकणाऱ्या २५ तरुण-तरुणींचा ग्रुप कॉन्सर्टला गेला होता. त्यापैकी काहींनी बाहेरूनच नशा करत आत प्रवेश केला, तर काहींनी आत प्रवेश केल्यानंतर नशा केल्याचे समोर येत आहे.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा होणार जबाब नोंद
कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. पोलिस माहिती घेऊन एकेकाला चौकशीसाठी बोलवित आहेत. आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
१,६०० ते २ हजारात विक्री
कॉन्सर्टमधील तरुणाईला गोळ्यांची १,६०० ते २ हजारात विक्री करण्यात आली होती. अनेकदा ग्राहक बघून भाव वाढतो. आतापर्यंत एकूण किती पुरवठा झाला? किती जणांनी याचे सेवन केले? याबाबत तपास सुरु आहे.
आनंदच्या वडीलांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे. ते रेशन माफिया म्हणून ओळखले जातात. तर आनंदच्या विरोधात कुठे गुन्हे नोंद आहे का? याबाबत तपास सुरु आहे.