दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 08:59 IST2026-04-15T08:51:49+5:302026-04-15T08:59:47+5:30
Dadar-Ratnagiri passenger: कोकणवासीयांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी अंतिम निर्णय ‘कार्यकारी व्यवहार्यता’ अहवालावर अवलंबून असणार आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
मुंबई - कोकणवासीयांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी अंतिम निर्णय ‘कार्यकारी व्यवहार्यता’ अहवालावर अवलंबून असणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात तपासणीचे आदेश दिले असून, याबाबतचे पत्र खासदार रवींद्र वायकर यांना पाठवले आहे.
करोना काळात २०२० मध्ये बंद झालेली ही पॅसेंजर अद्यापही पूर्ववत सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती. सध्या ही सेवा दिवा–रत्नागिरी या स्वरूपात चालत असल्याने दक्षिण मुंबई तसेच दहिसर–बोरिवली पट्ट्यातील प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे दादरहूनच गाडी सुरू करण्याची मागणी होती.
या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी प्रशासनाला सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रस्तावित तपासणीत वेळापत्रक, फलाटांची उपलब्धता, मार्गावरील तांत्रिक अडचणी तसेच उपनगरी लोकल सेवांवर होणारा परिणाम यांचा विचार केला जाणार आहे. विशेषतः दिवा परिसरात गाडी चालवताना उपनगरी मार्ग ओलांडावा लागतो, ज्यामुळे दररोज आठ लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो, असे रेल्वेचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, दादर हे मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असल्याने प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरते. त्यामुळे गाडी पुन्हा दादरहून सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी पुन्हा जोर धरला आहे. दरम्यान, या व्यवहार्यता अहवालासाठी कोणतीही ठराविक कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नसून, अहवाल सादर झाल्यानंतरच गाडीच्या पुनरारंभाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.