‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:03 IST2026-04-15T06:04:40+5:302026-04-15T07:03:29+5:30
West Bengal Assembly Election 2026: मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत (एसआयआर) निवडणूक आयोगाच्या वतीने वापरण्यात आलेला ‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग अधिकृतपणे वैधच नाही.

‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
कोलकाता - मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाअंतर्गत (एसआयआर) निवडणूक आयोगाच्या वतीने वापरण्यात आलेला ‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग अधिकृतपणे वैधच नाही. बिहारसारखा भाजपला याचा येथे राजकीय लाभ व्हावा म्हणून पश्चिम बंगालमध्ये अगदी निवडक प्रकरणांत हा शब्द वापरला गेला असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. भाजपसारखे खालच्या पातळीचे राजकारण करणारा पक्ष कधीही पाहिला नाही, असेही त्या म्हणाल्या.
ममतांनी सांगितले गर्दीचे गणित
भाजप उत्तर प्रदेश आणि बिहारला बंगालच्या ज्या भागांतून थेट रेल्वेसेवा आहे, अशा ठिकाणीच जाहीर सभा घेत आहे. या माध्यमातून अन्य राज्यांतील लोकांना बंगालमध्ये आणून सभेच्या ठिकाणी गर्दी जमवण्याचे हे गणित असल्याचे ममता यांनी सांगितले.