पाणी सोडा, अन्यथा खुर्ची मिळणार नाही! परभणीत जायकवाडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रणशिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 16:45 IST2026-04-27T16:44:55+5:302026-04-27T16:45:48+5:30
परभणीत जायकवाडीच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; आंदोलकांनी अभियंत्यांची खुर्ची केली जप्त

पाणी सोडा, अन्यथा खुर्ची मिळणार नाही! परभणीत जायकवाडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे रणशिंग
परभणी : जायकवाडी कालव्यात तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंत्यांची खुर्चीच जप्त केली. जोपर्यंत जायकवाडी कालव्यातून किमान १००० क्युसेकने पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत खुर्ची परत मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला.
परभणी जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव नाही, पीक विमा मिळाला नाही, आणि आता उरलेली पिकेही पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, याकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नियमानुसार २००० क्युसेकने पाणी सोडणे अपेक्षित असताना केवळ ८०० क्युसेकनेच विसर्ग सुरू असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची पिके जळत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकारी शेतकऱ्यांनी करत पाटबंधारे विभाग क्र. ०२ च्या कार्यालय गाठले. त्याठिकाणी कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर या अनुपस्थित असल्याचे समोर आले.
पाण्यासाठी त्यांच्या फोनवरून दोन-चार दिवसात पाणी सोडू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. याच संतापातून कार्यकर्त्यांनी थेट अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून जप्त केली. जोपर्यंत जायकवाडी कालव्यातून किमान १००० क्युसेकने पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत खुर्ची परत मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, उमेश देशमुख यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.