गीताच्या गुगलीवर हरभजन बोल्ड

By Admin | Updated: October 29, 2015 22:30 IST2015-10-29T22:30:18+5:302015-10-29T22:30:18+5:30

जगभरातील फलंदाजांना आपल्या फिरकीने नाचवणारा आॅफस्पिनर हरभजन सिंग गुरुवारी येथे अभिनेत्री गीता बसरा हिच्या ‘गुगली’वर बोल्ड झाला आहे.

HB bold on Geeta's googly | गीताच्या गुगलीवर हरभजन बोल्ड

गीताच्या गुगलीवर हरभजन बोल्ड

जालंधर : जगभरातील फलंदाजांना आपल्या फिरकीने नाचवणारा आॅफस्पिनर हरभजन सिंग गुरुवारी येथे अभिनेत्री गीता बसरा हिच्या ‘गुगली’वर बोल्ड झाला आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाचा ‘टर्बनेटर’ गीतासोबत आज विवाहबद्ध झाला.
हरभजन आणि गीता बसरा यांनी आज जालंधर फगवाडा रोडस्थित गुरुनानक मिशन नेत्रहीन आणि वृद्धाश्रमाच्या गुरुद्वारा येथे फेरे घेतले. या वेळेस आयपीएल टीम मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानी यांच्यासह अन्य दिग्गज उपस्थित होते.
क्रीम रंगाची शेरवानी आणि लाल रंगाची पगडी परिधान केलेल्या हरभजनने गीतासोबत गुरुग्रंथ साहिब येथे शीख रीतीरिवाजाप्रमाणे फेरे घेतले आणि विवाहाचे सोपस्कार पार पाडले. गीताने पारंपरिक लाल आणि सोनेरी लहंगा परिधान केला होता.
विवाहाचे रीतीरिवाज पार पडल्यानंतर भज्जीने गीतासोबत त्याची आई अवतौर कौर आणि गीताच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी अनेक दिग्गजांनी वधू-वरास शुभेच्छा दिल्या. विवाहानंतर हरभजन लगेच रणजी ट्रॉफी खेळण्यात व्यस्त होणार आहे. तो सध्या पंजाबच्या रणजी संघाचा कर्णधार आहे.
रिसेप्शन १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता आहे. याशिवाय युवराजसिंग, विराट कोहली, बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि प्रियंका चोपडा यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. भारतीय संघातील अन्य सदस्यदेखील रिसेप्शनला येण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: HB bold on Geeta's googly