धोनीला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे - गावस्कर

By Admin | Updated: October 12, 2015 12:38 IST2015-10-12T12:35:52+5:302015-10-12T12:38:58+5:30

धोनीला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचे सांगत माजी कप्तान सुनील गावस्कर त्याच्या बचावार्थ धावून आले आहेत

Dhoni is being made a scapegoat - Gavaskar | धोनीला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे - गावस्कर

धोनीला बळीचा बकरा बनवण्यात येत आहे - गावस्कर

>ऑनलाइन लोकमत, नवी दिल्ली, दि. १२ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या निसटत्या पराभवामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर चहूबाजूंनी टीका होत असतानाच माजी कप्तान सुनील गावस्कर त्याच्या बचावार्थ धावून आले असून धोनीला बळीचा बकरा बनवण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 
धोनीही आजही भारताचा अव्वल फिनिशर आहे, यात कोणतीही शंका नसल्याचे गावस्कर म्हणाले. वय वाढल्यामुळे शक्ती कमी होत असली तरी ही बाब फक्त खेळात नव्हे तर आयुष्यात सर्वत्र लागू होते. एखाद्या वेळेस संघ पराभूत झाला तर कोणाला ना कोणाला तरी बळीचा बकरा बनवण्यात येते, त्याचप्रमाणे यावेळेसे पराभवाचे खापर धोनीवर फोडले जात असल्याचे गावस्कर यांनी सांगितले. इतकी वर्ष धोनीने देशाला अनेक महत्वपूर्ण सामन्यांत यश मिळवून दिले आहेत, आज केवळ एका सामन्यातील खराब प्रदर्शनामुळे त्याची चमक फिकी पडणार नाही असेही ते म्हणाले.
गोलंदाजांनी पूर्वीच्या चुकांपासून कोणताही धडा घेतलेला नाही, हे कालच्या पराभवातून स्पष्ट झाल्याचे सांगत या क्षेत्रात ब-याच सुधारणेची गरज असल्याचे मत गावस्कर यांनी व्यक्त केले. 
 रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे विजयासमीप पोहोचल्यानंतरही भारतीय संघाला रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कानपूरमधील पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

Web Title: Dhoni is being made a scapegoat - Gavaskar