Sword in the name of Ganesh Naik in NCP | गणेश नाईकांच्या नावे राष्ट्रवादीने परजली तलवार

गणेश नाईकांच्या नावे राष्ट्रवादीने परजली तलवार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाढ यांना भेट दिलेली तलवार ते परजत असताना ही तलवार गणेश नाईक यांच्यासाठी का, असा सवाल कार्यक्रमात उपस्थित करण्यात आल्याने याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.


दिघा येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवारी जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत होत असताना कार्यकर्त्यांकडून त्यांना तलवार भेट देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांनी ही तलवार गणेश नाईक यांच्यासाठी का, असे उद्गार काढले. त्यावर उपस्थितांनी होकारार्थी साथ दिली. सध्या या घटनेची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यक्रमातील उपस्थितांनी उघडपणे तलवार परजत आमदार गणेश नाईक यांना धमकावण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप नाईक समर्थकांकडून होत आहे.


या घटनेनंतर माजी महापौर जयवंत सुतार यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. तसेच आमदार गणेश नाईक यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही मागणी केली आहे. या प्रकरणावरून आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमधील युद्ध अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Web Title: Sword in the name of Ganesh Naik in NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.