मृतदेहावरील दागिने लंपास; नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 02:16 AM2020-05-23T02:16:18+5:302020-05-23T02:17:24+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालयातून मृतदेहावरील दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे.

Lampas with ornaments on dead bodies; Types in Navi Mumbai Municipal Hospital | मृतदेहावरील दागिने लंपास; नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील प्रकार

मृतदेहावरील दागिने लंपास; नवी मुंबई महापालिका रुग्णालयातील प्रकार

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : वाशीतील महापालिका रुग्णालयातून मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या मुलीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. लंपास दागिन्यांपैकी काही दागिने त्यांना परत मिळाले असून मंगळसूत्राचा अद्याप शोध लागलेला नाही.
मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालयातून मृतदेहावरील दागिने लंपास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे.
सानपाडा येथील महिलेला कोरोनाची लक्षणे आढळल्याने महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबीयांना त्यांच्याशी फोनवर बोलण्यासही मनाई करण्यात आली होती. अशातच बुधवारी या महिलेने पतीला फोन करून आपल्याला रुग्णालयातून घेऊन जाण्याची विनंती केली होती. तसेच आपल्याला जीवाची भीती वाटत असल्याचीही चिंता व्यक्त केली. त्यानंतर काही तासांतच त्यांची प्रकृती खालावली व पुढील तीन तासांत त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. परंतु चाचणी अहवाल येईपर्यंत मृतदेह पालिका रुग्णालयातील शवागारातच ठेवण्यात आला आहे. या वेळी महिलेच्या नातेवाइकांनी त्यांच्या अंगावरील दागिन्यांची चौकशी केली. या वेळी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पळवण्याचा प्रकार घडला. रुग्णालयात दाखल केले तेव्हा आईच्या अंगावर १० ग्र्रॅमचे मंगळसूत्र, कर्णफुले होती, असे त्यांच्या मुलीने सांगितले. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर गुरुवारी त्यांना कानातली फुले देण्यात आली. मात्र मंगळसूत्राबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. रुग्णालय प्रशासन मौन धरून असल्याचा संताप महिलेच्या मुलीने केला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता रुग्णालयातून थेट अंत्यविधीसाठी नेला जातो. संशयास्पद मृतदेह बंदिस्त करून तो न उघडण्याच्या अटीवर नातेवाइकांच्या ताब्यात दिला जातो. याचा गैरफायदा घेऊन मृतदेहावरील दागिने लंपास केले असल्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थापन व प्रशासन यांची नाचक्की होत आहे.

दोन दिवसांपूर्वी मंगळसूत्र नव्हते
मुलीने रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, दोन दिवसांपासून त्यांच्या अंगावर मंगळसूत्र नव्हते, असे कळले. यावरून रुग्णालयातच मंगळसूत्राची चोरी झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी महिलेच्या मुलीने पोलीस आयुक्तांकडे केली.

Web Title: Lampas with ornaments on dead bodies; Types in Navi Mumbai Municipal Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.