The lack of travel opportunities in the lockdown reduced train accidents; 46 killed in Navi Mumbai | लॉकडाऊनमध्ये प्रवासाची संधी न मिळाल्याने रेल्वे अपघात घटले; नवी मुंबईत ४६ जणांचा मृत्यू

लॉकडाऊनमध्ये प्रवासाची संधी न मिळाल्याने रेल्वे अपघात घटले; नवी मुंबईत ४६ जणांचा मृत्यू

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षभरात रेल्वेअपघातामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये घडलेल्या अपघातांच्या तुलनेत २०२० मध्ये निम्म्याहून कमी अपघाती मृत्यू झाले आहेत. गतवर्षाचा बहुतांश कालावधी लॉकडाऊनमध्ये गेल्याने अपघातांमध्ये मोठी घट झाली आहे.

२०१९ मध्ये नवी मुंबईत एकूण १६९ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. परंतु गतवर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू रेल्वे अपघातात झाले असून ४ मृत्यू नैसर्गिक आहेत. तर २२ जण जखमी झाले आहेत. वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत मानखुर्द ते बेलापूर व वाशी ते ऐरोली दरम्यान हे अपघात घडले आहेत. त्यापैकी बहुतांश अपघात हे वाशी खाडीपूललगत अथवा मानखुर्द, जुईनगर व ज्या स्थानकांमध्ये रुळावरून प्रवेशाचा मार्ग मोकळा आहे अशा ठिकाणी घडले आहेत.

स्थानकात प्रवेशासाठी रुळावरून चालत जाण्याचा शॉर्टकट जीवावर बेतत आहे. मात्र २०२० मध्ये मार्चनंतर रेल्वे रुळावरच न धावल्याने असे अपघात टळले आहेत. तर रेल्वे सुरू झाल्यानंतरदेखील केवळ ठरावीक वर्गाच्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा असल्याने रेल्वेतली चेंगराचेंगरी व दरवाजातील प्रवास यालाही आळा बसला आहे. अप्रत्यक्षरीत्या याचा परिणाम प्राणांतिक अपघात टळण्यावर झाला आहे.

दरवर्षी दीडशेहून अधिक लोकांचा जातो प्राण
नवी मुंबईत रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये प्रतिवर्षी दीडशेहून अधिक व्यक्तींचे प्राण जातात. तर अनेक जण जखमी होतात. धावत रेल्वेत प्रवेश करणे, धावत्या रेल्वेतून उतरणे अशी काही त्यामागे कारणे आहेत. मात्र २०२० मध्ये रेल्वे प्रवासाची संधीच न मिळाल्याने अपघातांचे प्रमाण निम्म्याहून कमी आले आहे

गेल्या वर्षात वाशी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत ५१ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ४६ मृत्यू अपघाती असून ४ नैसर्गिक आहेत. तर २२ प्रवासी अपघातामध्ये जखमी झाले आहेत.- विष्णू केसरकर, वरिष्ठ निरीक्षक, वाशी रेल्वे पोलीस

 

Web Title: The lack of travel opportunities in the lockdown reduced train accidents; 46 killed in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.