Vegetable Prices: फरसबी २५० रुपये किलो, तर कोथिंबीरची जुडी ५० रुपयांना; वाढत्या उन्हाचा फटका आता थेट स्वयंपाक घरापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:29 IST2026-05-12T11:28:49+5:302026-05-12T11:29:44+5:30
Vegetable Price Rise: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असून, बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत.

Vegetable Prices: फरसबी २५० रुपये किलो, तर कोथिंबीरची जुडी ५० रुपयांना; वाढत्या उन्हाचा फटका आता थेट स्वयंपाक घरापर्यंत
नवी मुंबई : वाढत्या उन्हाचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरावर बसू लागला आहे. कडक तापमानामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन घटल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाली असून, बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत. फरसबीचे दर तर किरकोळ बाजारात २५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
सोमवारी बाजार समितीत सुमारे ४०० वाहनांमधून १९७० टन भाजीपाल्याची आवक झाली. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने दरवाढीचा परिणाम दिसून येत आहे.
उष्णतेमुळे भाजीपाला लवकर खराब होत असल्याने व्यापाऱ्यांनाही अतिरिक्त तोटा सहन करावा लागत आहे. विशेषतः सातारा, पुणे आणि सांगली परिसरातून येणाऱ्या फरसबीच्या उत्पादनात घट झाल्याने तिच्या दरांनी उच्चांक गाठला आहे.
होलसेल मार्केटमध्ये फरसबीला १६० ते २०० रुपये किलो दर मिळत असताना किरकोळ बाजारात ती २०० ते २५० रुपयांनी विकली जात आहे. गवार आणि घेवडा हेही १०० ते १२० रुपये किलो दराने विकले जात असून, वाटाणा आणि तोंडलीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, कोथिंबिरीच्या जुडीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. एपीएमसीमध्ये २० ते २६ रुपये जुडी दर असलेली कोथिंबीर किरकोळ बाजारात ४५ ते ५० रुपयांनी विकली जात आहे.
टोमॅटो, कोबीचे दर आवाक्यात
टोमॅटो आणि कोबीचे दर अद्याप नियंत्रणात असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बाजार समितीत कोबीला ४ ते ६ रुपये किलो दर मिळत असताना किरकोळ बाजारात तो ४० ते ६० रुपयांनी विकला जात आहे. टोमॅटोला होलसेलमध्ये १२ ते २४ रुपये दर असून, किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो भाव मिळत आहे.