‘नैना’च्या पहिल्या टप्प्याचा विकास दृष्टिपथात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:24 AM2019-11-06T02:24:26+5:302019-11-06T02:24:36+5:30

११ टीपी स्कीमचे नियोजन : पायाभूत सुविधांवर सात हजार कोटींचा खर्च

The development of the first phase of 'Naina' is in view | ‘नैना’च्या पहिल्या टप्प्याचा विकास दृष्टिपथात

‘नैना’च्या पहिल्या टप्प्याचा विकास दृष्टिपथात

Next

नवी मुंबई : ‘नैना’ क्षेत्राच्या पहिल्या टप्प्यातील २३ गावांचा विकास आता दृष्टिपथात आला आहे. पहिल्या टप्प्यातील तीन टीपी स्कीम अर्थात नगररचना परियोजनेला मंजुरी मिळाली आहे. ११ टीपी योजनेच्या माध्यमातून या संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्याचे सिडकोचे धोरण आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन टीपी योजनांना मंजुरी मिळाली आहे. तर सहा टीपी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत उर्वरित सर्व टीपी स्कीमला मंजुरी मिळवून नवीन वर्षात ‘नैना’ क्षेत्रात प्रत्यक्षात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. या संपूर्ण कामासाठी सिडकोने तब्बल सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास व्हावा, या दृष्टीने शासनाने रायगड जिल्ह्यातील २५६ व ठाणे जिल्ह्यातील १४ गावांतील सुमारे ५६० कि.मी. क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अर्थात ‘नैना’ क्षेत्र म्हणून अधिसूचित केले आहे. या क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात या क्षेत्रातील काही भाग नियोजनासाठी एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे सध्या ‘नैना’चे क्षेत्र २२४ गावांपुरते मर्यादित राहिले आहे. सिडकोने या ४७४ चौरस कि.मी. क्षेत्राच्या विकासासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पनवेल जवळील २३ गावांचा समावेश असलेला पायलट प्रोजेक्ट तयार करण्यात आला आहे. याच्या अंतरिम विकास योजनेला राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित २०१ गावांच्या विकास आराखड्यालाही राज्य सरकारने अलीकडेच मंजुरी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण ‘नैना’ क्षेत्राच्या विकासाचे परिपूर्ण नियोजन करणे सिडकोला शक्य होणार आहे. जमीन एकत्रीकरणाच्या माध्यमातून नगररचना परियोजनाअंतर्गत संपूर्ण ‘नैना’ क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. त्यानुसार ‘नैना’च्या पहिल्या टप्प्यात एकूण ११ नगररचना परियोजनांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यातील आठ नगररचना परियोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी तीन नगररचना परियोजनांना मंजुरी मिळाली आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत उर्वरित सर्व टीपी योजनांना मंजुरी मिळवून नवीन वर्षात ‘नैना’च्या पहिल्या टप्प्यात एकत्रितरीत्या पायाभूत सुविधांच्या कामाला सुरुवात करण्याचा सिडकोचा मानस आहे. यासाठी तब्बल सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ही रक्कम ‘नैना’ योजनेअंतर्गत भूधारकांकडून सिडकोला प्राप्त होणाºया ४० टक्के भूखंडांपैकी १५ टक्के भूखंडांच्या विक्रीतून उभारली जाणार आहे.

४७४ चौरस कि.मी. क्षेत्राचा होणार विकास
पहिल्या तीन नगरचना परियोजनांमुळे एकूण ६४८ हेक्टर क्षेत्राचा नियोजित विकास आराखडा तयार झाला आहे. ११ नगरचना परियोजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील ४७४ चौरस कि.मी. क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. मंजुरी मिळालेल्या तीन नगररचना योजनेंतर्गत २५० हेक्टर क्षेत्रफळावर एकूण ८३० अंतिम भूखंड जमीनमालकांना विकासासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय शाळांसाठी १७ भूखंड राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ७७ हेक्टर जमिनीवर उद्याने आणि खेळाची मैदाने विकसित केली जाणार आहेत.

५२ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली असून २६ हेक्टर जमीन ही सामाजिक सुविधांसाठी आणि ३५ हेक्टर जमीन ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या गृहनिर्मितीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याशिवाय खेळाचे क्रीडांगण, अग्निशमन केंद्र, पोलीस स्टेशन उभारण्याकरिता सहा हेक्टर जमीन तीन टीपी स्कीमच्या माध्यमातून राखीव ठेवण्यात येणार आहे.
 

Web Title: The development of the first phase of 'Naina' is in view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.