भिवंडी-कल्याण प्रवास तीन तासांचा

By Admin | Updated: September 22, 2015 03:41 IST2015-09-22T03:41:34+5:302015-09-22T03:41:34+5:30

भिवंडी-कल्याण-दुर्गाडी पुलावर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीची संधी साधून ऐन सणाच्या काळात रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली

Bhiwandi-Kalyan travel three hours | भिवंडी-कल्याण प्रवास तीन तासांचा

भिवंडी-कल्याण प्रवास तीन तासांचा

भिवंडी : भिवंडी-कल्याण-दुर्गाडी पुलावर दररोज होणाऱ्या वाहतूककोंडीची संधी साधून ऐन सणाच्या काळात रिक्षाचालकांनी प्रवाशांची लूट सुरू केली असून अशा प्रकारे अवैध भाडेवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.
भिवंडीत रेल्वे स्थानक नसल्याने शहरातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी कल्याण अथवा ठाणे येथे मिळेल त्या वाहनाने जावे लागते. भिवंडी-कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावर दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने तसेच जड वाहने व छोट्या वाहनांची वर्दळ वाढल्याने नेहमी वाहतूककोंडी होते. सणाच्या काळात तीभिवंडीच्या दिशेने एक ते दोन किलोमीटरपर्यंत होते. या कोंडीत एसटी महामंडळ व कल्याण-डोंबिवली मनपाच्या बसेसही अडकतात. त्यामुळे प्रवासी रिक्षाचा पर्याय स्वीकारतात. ही संधी साधून कल्याण-भिवंडी मार्गावरील भिवंडी आणि कल्याणचे रिक्षाचालक आणि ओमनीचालक मनमानीपणे भाववाढ करतात. या भाववाढीवर वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. सध्या गणेशोत्सव सुरू झाल्यापासून ही वाहतूककोंडी वाढली असून प्रत्येक वाहनास पूल ओलांडायला एक ते दीड तास तर कोंडीतून मार्ग काढायला दीड तास असा तीन तासांचा प्रवास करावा लागतो. वास्तविक, पंधरा मिनिटांच्या प्रवासाला तीन तास घालावे लागत असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष खदखदत आहे.

Web Title: Bhiwandi-Kalyan travel three hours