ऐरोली गोळीबार; मुख्य सूत्रधारासह पाच जण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:37 IST2026-04-14T07:37:34+5:302026-04-14T07:37:58+5:30
Navi Mumbai Crime News: ऐरोली सेक्टर-१ येथील ६ एप्रिलच्या प्राणघातक गोळीबार प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी मुख्य शूटरसह कटाचा सूत्रधार व बेकरी व्यावसायिक गुरफान खान याच्यासह पाच जणांना अटक केली.

ऐरोली गोळीबार; मुख्य सूत्रधारासह पाच जण जेरबंद
नवी मुंबई - ऐरोली सेक्टर-१ येथील ६ एप्रिलच्या प्राणघातक गोळीबार प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी मुख्य शूटरसह कटाचा सूत्रधार व बेकरी व्यावसायिक गुरफान खान याच्यासह पाच जणांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेज व तब्बल ७,७०० मोबाइल क्रमांकांच्या डंपडेटाच्या विश्लेषणातून हा गुन्हा उघड झाल्याचे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
बिल्डर संदीप गवस यांच्याशी जुना आर्थिक वाद व बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाईच्या रागातून हा हल्ला घडवण्यात आला. गुरफानने राहुल ऊर्फ पवन सहानी याला सुपारी दिल्याचे सांगितले.
६ एप्रिलच्या मध्यरात्री मोटारसायकलवरून आलेल्या राहुलने गवस व आरटीआय कार्यकर्ता अमित मौर्य याच्यावर गोळीबार केला. यात मौर्य गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर गवस थोडक्यात बचावला. रबाळे पोलिस व गुन्हे शाखेने चोरीची मोटारसायकल जप्त केली व डंपडेटाच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचले. या प्रकरणात शूटर राहुल सहानीसह दुचाकी पुरवणारा सय्यद खान, आर्थिक मदत करणारा नागेश माने आणि हालचालींची माहिती देणारा विशाल महाडिक यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.