‘विचार सोडला, वारसा सोडला, कार्यकर्ते गेले, मते गेली, उरलं काय?’, जिल्हा परिषद निकालांतर भाजपाचा उद्धवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:07 IST2026-02-10T13:06:42+5:302026-02-10T13:07:42+5:30
ZP Election Result 2026: काल लागलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमघ्ये भाजपाने स्वबळावर आणि मित्रपक्षांसोबत मिळून बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयानंतर भाजपाने आपला पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष आणि सध्याचा राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धवसेनेला चिमटा काढला आहे.

‘विचार सोडला, वारसा सोडला, कार्यकर्ते गेले, मते गेली, उरलं काय?’, जिल्हा परिषद निकालांतर भाजपाचा उद्धवसेनेला टोला
सोमवारी लागलेल्या राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपाने स्वबळावर आणि मित्रपक्षांसोबत मिळून बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयानंतर भाजपाने आपला पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष आणि सध्याचा राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धवसेनेला चिमटा काढला आहे. ‘विचार सोडला, वारसा सोडला, कार्यकर्ते गेले, मते गेली, उरलं काय? फक्त पानिपट’ असा टोला भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धवसेनेनेला डिवचले. या पोस्टमध्ये उपाध्ये यांनी लिहिलं की, बाळासाहेबांनी जे कमावले, ते उद्धव ठाकरेंनी गमावले आहे. कधीकाळी केंद्रात मंत्रिपदे, राज्यात मंत्रिपदे, मुंबई-ठाण्यासारख्या महापालिकांमध्ये सत्ता आणि महापौरपदाचा मान, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समित्यांचे कारभारी अशी उद्धवसेनेची राजकीय भरभराट सर्वदूर पसरलेली होती. पण आजचं वास्तव मात्र वेगळंच आहे.
आज उद्धवसेनेकडे ना केंद्रात मंत्रिपद आहे, ना विधान परिषदेत स्वत: परत निवडून येण्याइतकी आमदारांची ताकद आहे. उद्धवसेनेकडून महानगरपालिका गेल्या, सत्ता गेली. जिल्हा परिषदांमध्ये तर अक्षरशः धुव्वा उडाला आहे. एकाही जिल्हा परिषदेत दोन आकडी संख्या गाठता आली नाही. राज्यभरातील जिल्हा परिषद सदस्यांचा आकडा ५० ही पार करू शकला नाही. उद्धवसेनेने विचार सोडला, वारसा सोडला. त्यांचे कार्यकर्ते गेले आणि मतेही गेली. आता उरलं काय? तर फक्त पानिपत, असा टोला केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.