मार्च अखेरपर्यंत २ नवीन ट्रेन ताफ्यात येणार; मुंबई-दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:44 IST2026-02-20T19:42:00+5:302026-02-20T19:44:57+5:30
Vande Bharat Sleeper Train: दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार असून, मार्च अखेरपर्यंत तिसरी आणि चौथी स्लीपर वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येऊ शकेल.

मार्च अखेरपर्यंत २ नवीन ट्रेन ताफ्यात येणार; मुंबई-दिल्ली मार्गावर स्लीपर वंदे भारत धावणार?
Vande Bharat Sleeper Train: हावडा ते कामाख्या मार्गावर भारताची पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीच या ट्रेनला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास १०० टक्के क्षमतेने ही ट्रेन सुरू आहे. प्रवाशांच्या फिडबॅकनुसार भारतीय रेल्वे वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सेवेत बदलही करत आहे. तसेच २४ कोचच्या स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वे तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. यातच मार्च २०२६ अखेरपर्यंत दोन नव्या कोऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
भारतीय रेल्वे आणखी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची तयारी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मार्चपर्यंत आणखी दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी स्लीपर वंदे भारत ट्रेनची बांधणी करण्यावर भर देत आहेत. चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) सोबत BEML च्या मूळ करारानुसार, प्रत्येकी १६ कोच असलेले एकूण १० स्लीपर वंदे भारत ट्रेन रेक ३१ मार्चपर्यंत भारतीय रेल्वेला सोपवायचे होते. परंतु, ICF सूत्रांचे म्हणणे आहे की, या मुदतीत एवढे रेक येणे सध्या तरी शक्य दिसत नाही. त्यामुळे ही मुदत वाढवली जाऊ शकते.
मार्च अखेरपर्यंत २ नवीन ट्रेन ताफ्यात येणार
आयसीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला मार्च अखेरपर्यंत तिसरा आणि चौथा स्लीपर वंदे भारत ट्रेनचा रेक मिळेल, अशी अपेक्षा आहे. उर्वरित सहा रेकसाठी आम्ही दरमहा एक रेक देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या, १० रेकच्या सुरुवातीच्या बॅचसाठी ऑगस्ट ही नवीन संभाव्य अंतिम मुदत असू शकते. बेंगळुरूहून ते रेल्वेच्या ताफ्यात येणार असले तरी, त्यांची ट्रायल, टेस्टिंग आणि अप्रुव्हल ही सगळी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यामुळे घाई करण्यात काही अर्थ नाही. आताच्या घडीला वंदे भारत स्लीपर ट्रेनचा दुसरा रेक तयार असून, त्याच्या बहुतेक सर्व चाचण्या झाल्या आहेत. दुसरी वंदे भारत ट्रेन नेमक्या कोणत्या मार्गावर चालवली जाईल, याकडे देशातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रचंड मागणी लक्षात घेता, रेल्वे मंत्रालयाने भविष्यात २६० रेक तयार करण्याची योजना अधिकृतपणे जाहीर केली आहे. आयसीएफ सूत्रांचे म्हणणे आहे की, ICF मध्ये ५० रेक बांधले जातील आणि ते अन्य रॅकपेक्षा वेगळे असतील. या रेकमध्ये २४ कोच असतील ज्यात पेंट्री कार असेल. दिल्ली-अमृतसर, दिल्ली-श्रीनगर, दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता अशा प्रवाशांची सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांवर स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रस्तावित आहे.