चार राज्यांत कोणाचा का विजय?; 'टुडेज चाणक्य'च्या सर्वेक्षणातून उलगडले जातीय समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 07:48 IST2026-05-01T07:46:42+5:302026-05-01T07:48:04+5:30
विधानसभा निवडणूक: केरळमध्ये झालेल्या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांपेक्षा मतदानात महिलांचा उत्साह सर्वाधिक पाहायला मिळाला.

चार राज्यांत कोणाचा का विजय?; 'टुडेज चाणक्य'च्या सर्वेक्षणातून उलगडले जातीय समीकरण
पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर, तृणमूलला अल्पसंख्याकांचा आधार
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. विविध समाजघटकांमध्ये मिळालेल्या पाठिंब्यामुळे भाजपने व्यापक सामाजिक आधार तयार केला आहे. अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग व अनुसूचित जमातींमध्ये भाजपला पाठिंबा मिळताना दिसतो, ज्यामुळे त्यांना राज्यभर स्पर्धात्मक लाभ होईल, असे दिसते. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसला मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. मात्र हा आधार राज्यभर समान प्रमाणात नसल्याने सत्तेपर्यंत पोहोचणे कठीण आहे, असे टुडेज चाणक्यच्या सर्वेक्षणात आढळले.
राज्यात दोन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९२.४७ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ९३.१३ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ९१.६६ टक्के मतदान झाले. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वाधिक टक्केवारी आहे. यंदा २०११ चा ८४ टक्के मतदानाचा विक्रम मोडला.
तामिळनाडूमध्ये द्रमुकचा वरचष्मा, अण्णाद्रमुक आणि टीव्हीकेमध्ये स्पर्धा
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीत द्रमुक आघाडीवर असल्याचे चित्र आहे. विविध समाजघटकांमध्ये मिळालेल्या पाठिंब्यामुळे द्रमुकने राज्यभर मजबूत पकड निर्माण केली आहे. मागासवर्ग आणि अति मागासवर्ग (एमबीसी) यामध्ये द्रमुकला स्थिर पाठिंबा मिळताना दिसतो, तर अनुसूचित जाती, मुस्लीम व ख्रिश्चन समाजातही त्यांची मजबूत उपस्थिती आहे. अण्णाद्रमुक काही पारंपरिक मतदारांमध्ये टिकून असली, तरी राज्यव्यापी प्रभाव कमी होताना दिसतो. टीव्हीला सत्तेसाठी आवश्यक मतदारांचा व्यापक आधार अजून तयार झालेला नाही.
आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक का होणार? की काँग्रेस ठरणार वरचढ?
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाची हॅट्-ट्रिक करेल असा अंदाज अनेक एक्झिटपोलमध्ये वर्तविला आहे. टुडेज चाणक्यच्या एक्झिटपोलनुसार भाजपला अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, अनुसूचित जमाती यांचा पाठिंबा मिळेल. त्या तुलनेत काँग्रेसकडे मुस्लीम मतांचे पाठबळ असून, त्यांना सत्ता मिळवता येणार नाही. आकडेवारीनुसार , भाजपला मिळणारी मते विजयामध्ये परावर्तीत होणारी आहेत. काँग्रसकडे येणारी मते ही विजयाच्या समिप नेणारी नसतील.
केरळमध्ये यूडीएफ विरुद्ध एलडीएफ थेट लढत, भाजप अजूनही बाहेरच?
केरळमध्ये झालेल्या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांपेक्षा मतदानात महिलांचा उत्साह सर्वाधिक पाहायला मिळाला. या निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानातील हा फरक सर्वाधिक म्हणजे ५.८५ टक्के राहिल्याचे दिसून आले. यामुळे यूडीएफ विरुद्ध एलडीएफ लढत दिसून आली. केरळमध्ये विधानसभा निवडणुकीत पारंपरिक यूडीएफ आणि एलडीएफ यांच्यातच मुख्य लढत असल्याचं चित्र दिसत आहे. विविध समाजघटकांमध्ये मतांचे स्पष्ट विभाजन झाल्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची बनली आहे. टुडेज चाणक्यच्या आकडेवारीनुसार उच्चवर्णीय नायर समाजात भाजपला काही प्रमाणात वाढलेला पाठिंबा दिसतो, तर मुस्लीम आणि ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणावर यूडीएफकडे झुकलेले आहेत. दुसरीकडे, इझावा आणि अनुसूचित जातींमध्ये एलडीएफला मजबूत पकड मिळताना दिसते.