लढत अटीतटीची असताना ममता बॅनर्जींनी तीन जागा सोडल्या...; डाव असा टाकला की भाजप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 09:08 IST2026-03-18T09:06:33+5:302026-03-18T09:08:22+5:30
West Bengal Election Update: ममता बॅनर्जी यांनी दार्जीलिंगमधील ३ जागा अनित थापा यांच्या BGPM ला देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला रोखण्यासाठी टीएमसीचा नवा डाव.

लढत अटीतटीची असताना ममता बॅनर्जींनी तीन जागा सोडल्या...; डाव असा टाकला की भाजप...
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, तृणमूल काँग्रेसने दार्जीलिंग पर्वतीय क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी रणनीती आखली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दार्जीलिंगमधील तीन विधानसभा जागा आपल्या मित्रपक्षाला, म्हणजेच भारतीय गोर्खा प्रजातांत्रिक मोर्चा (BGPM) ला देण्याचे जाहीर केले आहे.
अनित थापा यांच्या नेतृत्वाखालील 'बीजीपीएम' हा पक्ष दार्जीलिंगमध्ये टीएमसीचा महत्त्वाचा मित्रपक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी दार्जीलिंग, कालिम्पोंग आणि कर्सियांग या तीन जागांवर टीएमसीचे उमेदवार उभे न करता बीजीपीएमला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपला रोखण्याचे आव्हान
गेल्या काही निवडणुकांमध्ये दार्जीलिंग परिसरात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी स्थानिक गोरखा नेत्यांना सोबत घेण्याचे धोरण अवलंबले आहे. गोरखालँडच्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या या भागात शांतता राखणे आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणे, हे या युतीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
टीएमसीची रणनीती
ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे की, पहाडी भागात स्थानिक पक्षांना संधी दिल्यास तिथल्या जनतेचा विश्वास संपादन करणे सोपे जाईल. या बदल्यात बीजीपीएम हा पक्ष उर्वरित उत्तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.