चालू आयपीएल हंगामात आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि युवा अष्टपैलू राज अंगद बावा दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दोन्ही खेळाडू सध्या आपापल्या घरी असून दुखापतीतून सावरत आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना डी कॉकच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. तर, पंजाब किंग्जविरुद्धच्या मागील सामन्यादरम्यान चंदीगडच्या या अष्टपैलू खेळाडूच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. मुंबई इंडियन्सने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे की, आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते लवकरच या दोन्ही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संघात पर्यायी खेळाडूंची घोषणा करतील.
क्विंटन डी कॉकने मुंबईसाठी शेवटचा सामना २३ एप्रिल रोजी खेळला होता. या हंगामात खेळलेल्या ३ डावांमध्ये त्याने एकूण १३२ धावा कुटल्या होत्या, ज्यामध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ठोकलेल्या नाबाद ११२ धावांच्या धडाकेबाज शतकीय खेळीचाही समावेश आहे. तर, भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू असलेल्या २३ वर्षीय राज अंगद बावाने या वर्षी मुंबईसाठी ३ सामने खेळले. गेल्या वर्षीच्या हंगामातही त्याला ३ सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली होती.
मुंबई इंडियन्सचा फ्लॉप शो
मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक राहिला आहे. संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांपैकी मुंबईला केवळ ४ सामन्यांत विजय मिळवता आला आहे, तर संघाचा 'नेट रन-रेट ०.५०४ इतका खालावला आहे. मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी प्रतिष्ठेसाठी त्यांना उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. मुंबईला त्यांचे पुढील दोन सामने कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचे आहेत.