Akhilesh Yadav : "दीदींनी ED ला हरवलं, भाजपालाही हरवतील"; ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अखिलेश यादव मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:55 IST2026-01-27T17:54:43+5:302026-01-27T17:55:37+5:30
Akhilesh Yadav And Mamata Banerjee : अखिलेश यादव यांनी हावडा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

Akhilesh Yadav : "दीदींनी ED ला हरवलं, भाजपालाही हरवतील"; ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अखिलेश यादव मैदानात
पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. जसजसे निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत, तसतसं राज्यातील राजकारण तापत आहे. २९४ विधानसभा जागांसाठी यावर्षी मार्च-एप्रिलमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहे. अद्याप अधिकृत तारखांची घोषणा झालेली नसली तरी, राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव आज बंगाल दौऱ्यावर होते. हावडा येथे त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ही भेट अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे.
विशेष म्हणजे, ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा बंगालमध्ये 'स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन' (SIR) सुरू आहे. यावेळी अखिलेश यादव यांनी हावडा येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "दीदींनी (ममता बॅनर्जी) ईडीला (ED) हरवलं आहे आणि आता त्या भाजपालाही हरवतील" असं म्हणत निशाणा साधला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आणि टीएमसीवर आपला विश्वास व्यक्त केला. अलीकडेच झालेल्या 'आय-पॅक' (I-PAC) वरील छापेमारीच्या प्रकरणावरून त्यांनी भाजपाला धारेवर धरले. अखिलेश यादव म्हणाले की, "बंगालमधील भाजपाची लढाई ही हरण्यासाठीची लढाई आहे. राज्यातील जनता दीदींच्या पाठीशी आहे. हे लोक आपल्या देशाच्या धर्मनिरपेक्षतेशी खेळ करत आहेत. मला आनंद आहे की दीदींनी ईडीला हरवलं. भाजपा आता 'पेन ड्राईव्ह'च्या वेदना विसरू शकत नाही"
हे संपूर्ण प्रकरण ८ जानेवारीचं आहे, जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राजकीय सल्लागार संस्था 'आय-पॅक' (I-PAC) चे कार्यालय आणि त्याचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावर छापेमारी केली होती. ईडीच्या या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः दोन्ही ठिकाणी पोहोचल्या होत्या. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि कोलकाता पोलीस आयुक्त मनोज वर्मा त्यांच्यासोबत होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आय-पॅक कार्यालयातून काही कागदपत्रं सोबत नेल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी आरोप केला होता की, भाजपानेच ही छापेमारी घडवून आणली आहे. ईडीचा वापर करून टीएमसीच्या उमेदवारांची यादी जप्त करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.