पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर आता बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड केली जाईल, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करणारे शुभेंदू अधिकारी, ज्येष्ठ नेते दिलीप घोष, समिक भट्टाचार्य, सुकांत मुजुमदार, अग्निमित्रा पॉल, रूपा गांगुली यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी काही निकष स्पष्ट करत आधीच संकेत दिले होते. त्यामुळे आता पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना अमित शाह कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भारात असताना ममता बॅनर्जी यांनी राज्यात भाजपाची सत्ता आल्यास कुणीतरी बाहेरची व्यक्ती पश्चिम बंगालची मुख्यमंत्री होईल, असा दावा केला होता. ममता बॅनर्जी यांचा हा दावा खोडून काढताना अमित शाह यांनी भाजपा सत्तेवर आल्यास बंगालचा मुख्यमंत्री कोण होईळ याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली होती. पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री जो कुणी होईल, तो बंगालमध्ये जन्मलेला असेल, तो वंगभूमीचा सुपुत्र असेल, बंगालमध्ये शिकलेला असेल, बंगाली बोलणारा असेल आणि भाजपाचा कार्यकर्ता असेल, असे अमित शाह यांनी सांगितले होते. आता बंगालचे पर्यवेक्षक म्हणून अमित शाह यांच्याकडेच मुख्यमंत्र्याची निवड करण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. त्यामुळे आता अमित शाह हे पश्चिम बंगालमधील भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्रिपदासाठी कुणाच्या नावाची घोषणा करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सद्यस्थितीत अमित शाह यांनी ठरवलेल्या निकषांमध्ये शुभेंदू अधिकारी हे एकदम फिट बसतात. तसेच २०२१ मध्ये नंदीग्राम आणि २०२६ मध्ये भवानीपूर येथून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभूत करून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड करताना अमित शाह यांची पहिली पसंती ही शुभेंदू अधिकारी यांना असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य हे डार्क हॉर्स ठरण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहेत.
याशिवाय ज्येष्ठ नेते म्हणून दिलीप घोष, तसेच शांत संयमी चेहरा म्हणून सुकांत मुजुमदार, महिला चेहरा म्हणून अग्निमित्रा पॉल यांच्या नावांचाही विचार अमित शाह करण्याची शक्यता आहे. आता या सर्व नावांमधून धक्कातंत्राचा वापर करून अमित शाह आणि भाजपाकडून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
Web Summary : Speculation surrounds Bengal's next CM after BJP's win. Shah hinted at a Bengal-born, educated, Bengali-speaking BJP worker. Shubhendu Adhikari fits the criteria, but others like Ghosh and Paul are also in consideration. Shah's decision is awaited.
Web Summary : भाजपा की जीत के बाद बंगाल के अगले सीएम को लेकर अटकलें। शाह ने बंगाल में जन्मे, शिक्षित, बंगाली भाषी भाजपा कार्यकर्ता का संकेत दिया। शुभेंदु अधिकारी मानदंडों पर खरे उतरते हैं, लेकिन घोष और पॉल जैसे अन्य भी विचार में हैं। शाह के फैसले का इंतजार है।