नोकरीतून काढल्याचा राग; HPCL च्या प्लांटमध्ये GM आणि AGM ची गोळ्या झाडून हत्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:01 IST2026-03-12T18:58:46+5:302026-03-12T19:01:27+5:30
Uttar Pradesh Crime: दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ!

नोकरीतून काढल्याचा राग; HPCL च्या प्लांटमध्ये GM आणि AGM ची गोळ्या झाडून हत्या...
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात गुरुवारी धक्कादायक घटना घडली. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या इथेनॉल प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात जनरल मॅनेजर सुधीर कुमार गुप्ता आणि असिस्टंट जनरल मॅनेजर हर्षित मिश्रा यांचा मृत्यू झाला आहे. नोकरीतून काढून टाकल्याच्या रागातून माजी वेंडरने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्लांटमध्ये घुसून अधिकाऱ्यांवर गोळीबार
ही घटना बदायूं जिल्ह्यातील दातागंज परिसरातील सहजनी गावाजवळील प्लांटमध्ये घडली. आरोपी अजय प्रताप सिंह उर्फ रामू दुपारी सुमारे १.३० वाजता बंदूक घेऊन प्लांटमध्ये शिरला आणि थेट जनरल मॅनेजरच्या कार्यालयात पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने जीएम सुधीर कुमार गुप्ता यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून सहाय्यक व्यवस्थापक हर्षित मिश्रा मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपीने त्यांच्यावरही गोळी झाडली. या घटनेनंतर संपूर्ण प्लांट परिसरात मोठी खळबळ उडाली.
रुग्णालयात मृत्यूची पुष्टी
गोळीबारानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी जीएम सुधीर कुमार गुप्ता आणि एजीएम हर्षित मिश्रा यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नोकरीतून काढल्यामुळे होता नाराज
जिल्हाधिकारी अविनाश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय प्रताप सिंह उर्फ रामू हा सहजनी गावचा रहिवासी असून, तो इथेनॉल प्लांटमध्ये वेंडर म्हणून काम करत होता. काही काळापूर्वी कामातील निष्काळजीपणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यात आरोपीचाही समावेश होता. नोकरी गमावल्यानंतर आरोपी जनरल मॅनेजरवर नाराज होता आणि त्यांना धमक्याही देत होता. या संदर्भात सुधीर कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर प्लांटच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आरोपी शस्त्रासह प्लांटच्या परिसरात कसा पोहोचला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला का थांबवले नाही किंवा तपासणी का केली नाही, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.