नदी कोरडी केली तरी मृतदेह बेपत्ताच

By Admin | Updated: June 15, 2014 03:04 IST2014-06-15T03:04:50+5:302014-06-15T03:04:50+5:30

हिमाचल प्रदेशच्या मंडीजवळ व्यास नदीत वाहून गेलेल्या हैदराबादच्या १७ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शनिवारी राबविण्यात आलेली विशेष मोहीमही अपयशी ठरली

Though the river is dry, dead bodies disappear | नदी कोरडी केली तरी मृतदेह बेपत्ताच

नदी कोरडी केली तरी मृतदेह बेपत्ताच

मंडी : हिमाचल प्रदेशच्या मंडीजवळ व्यास नदीत वाहून गेलेल्या हैदराबादच्या १७ विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शनिवारी राबविण्यात आलेली विशेष मोहीमही अपयशी ठरली. या मोहिमेअंतर्गत बचाव पथकाच्या ६०० सदस्यांनी व्यास नदीचा तीन कि.मी.चा परिसर पिंजून काढला. या दरम्यान नदीच्या पाण्याची पातळी कमी करण्यात आली होती. परंतु एकाही विद्यार्थ्याचा मृतदेह हाती लागला नाही.
६०० सदस्यांच्या या बचाव पथकात ४५० कर्मचारी आणि पाणबुडे आहेत. शिवाय यात हैदराबादचे १५ पाणबुडेही सामील झालेले आहेत. त्यांनी पोंग धरणाकडे जाणाऱ्या ३ कि.मी.च्या नदीमार्गावर शोध घेतला. शनिवारी सकाळी ६ वाजता ही शोधमोहीम सुरू झाली आणि सायंकाळी ८ वाजता बंद करण्यात आली. यादरम्यान एकाही विद्यार्थ्याचा मृतदेह हाती लागला नाही. याआधी केवळ आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले होते. मृतदेह शोधण्याचा हा सहावा दिवस आहे. मृतदेह शोधण्यासाठी मानवरहित विमानाचीही मदत घेण्यात आली होती. ८ जून रोजी हे विद्यार्थी व्यास नदीत वाहून गेले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Though the river is dry, dead bodies disappear