...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 20:46 IST2025-06-10T20:46:02+5:302025-06-10T20:46:35+5:30
Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी आणि सोनम हे बेपत्ता झाल्यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांनी मेघालय सरकार आणि तेथील प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता या प्रकरणातील सत्य माहिती समोर आल्यानंतर राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालयची माफी मागावी, अशी मागणी मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी केली आहे.

...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा
लग्नानंतर मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हे जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, काही दिवसांनी राजा रघुवंशी याचा मृतदेह शिलाँगजवळील वेईसाडोंग फॉल्स या ठिकाणी कुजलेल्या स्थितीत सापडला होता. तसेच राजा रघुवंशी याची हत्या ही त्याची पत्नी सोनम हिनेच सुपारी देऊन केल्याची धक्कादायक माहिती तपासामधून समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी सोनम हिला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी राजा रघुवंशी आणि सोनम हिच्या कुटुंबीयांना इशारा दिला आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम हे बेपत्ता झाल्यानंतर या दोघांच्याही कुटुंबीयांनी मेघालय सरकार आणि तेथील प्रशासनावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता या प्रकरणातील सत्य माहिती समोर आल्यानंतर राजा रघुवंशी आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालयची माफी मागावी, अशी मागणी मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झँडर लालू हेक यांनी केली आहे. राजा आणि सोनम यांच्या कुटुंबीयांनी मेघालय राज्य आणि येथील जनतेची प्रतिमा मलिन केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरोधात खटला दाखल केला जाईल, असा इशारा अलेक्झँडर लालू हेक यांनी दिला आहे.
राजा रघुवंशी बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. या पत्रामधून रघुवंशी कुटुंबीयांनी मेघालयमधील पोलीस आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे मंत्री अलेक्झँडर लालू हेक हे नाराज झाले आहेत. मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा त्वरित तपास करून आरोपी सोनम हिच्यासह इतर आरोपींना अटक केली आहे. या कुटुंबांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, असा आरोपही मेघालयच्या मंत्र्यांनी केला. दरम्यान, हा गुन्हा मेघालयमध्ये घडला होता. त्यामुळे आरोपींना इथेच आणलं जाईल, असेही त्यांनी सांगितले.