शक्तिप्रदर्शनावरून मध्य प्रदेशात संघर्षाची चिन्हे, राज्यपालांच्या आदेशावर विधानसभा अध्यक्षांचे मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 05:51 AM2020-03-16T05:51:15+5:302020-03-16T05:55:20+5:30

मध्य प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. प्रथेनुसार अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर लगेच सरकारने बहुमत सिद्ध करावे असे अधिकृत पत्र राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले.

Signs of conflict in Madhya Pradesh on floor test, Assembly Speaker silence on Governor's orders | शक्तिप्रदर्शनावरून मध्य प्रदेशात संघर्षाची चिन्हे, राज्यपालांच्या आदेशावर विधानसभा अध्यक्षांचे मौन

शक्तिप्रदर्शनावरून मध्य प्रदेशात संघर्षाची चिन्हे, राज्यपालांच्या आदेशावर विधानसभा अध्यक्षांचे मौन

googlenewsNext

भोपाळ : ज्योतिरादित्य शिंदे समर्थक २२ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अल्पमतात आलेल्या मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांच्या काँग्रेस सरकारने उद्या, सोमवारीच विधानसभेत बहुमत सिद्ध करावे, असा आदेश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिला आहे. मात्र खरेच त्यानुसार विश्वासदर्शक ठराव सोमवारीच मतदानास येण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट न केल्याने यावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. प्रथेनुसार अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होईल. त्यानंतर लगेच सरकारने बहुमत सिद्ध करावे असे अधिकृत पत्र राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले. विश्वासदर्शक ठरावाच्या परीक्षेतआम्ही उत्तीर्ण होऊ असा विश्वास मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसने सत्ता राखण्यासाठी तर कमलनाथांचे सरकार पाडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. जयपूर येथे हलविण्यात आलेल्या काँग्रेस आमदारांपैकी ८५ जणांना तेथून रविवारी भोपाळला परत आणण्यात आले. (वृत्तसंस्था)


दिल्लीतही घडामोडी
केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ज्योतिरादित्य शिंदे, शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान यांची रविवारी सकाळी एक बैठक झाली. कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करता येऊ नये म्हणून आखलेल्या रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असलेल्या २२ बंडखोर काँग्रेस आमदारांना बंगळुरूमधील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने सीआरपीएफ सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी या आमदारांनी केली आहे.

मध्य प्रदेश सरकारने बहुमत गमावले आहे
काँग्रेसच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या मध्य प्रदेश सरकारने बहुमत गमावले आहे, म्हणून ते बहुमत चाचणीपासून पळ काढत आहे, असा आरोपी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी केला. 


बहुमत चाचणीचे मतदान कसे घ्यायचे यावरून वाद
भोपाळ : सोमवारी बहुमताची चाचणी घेण्याचा आदेश मध्य प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षांना द्यावा अशी मागणी राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे भाजपच्या नेत्यांनी रविवारी भेट घेऊन केली. विधानसभेतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा कार्यान्वित नसल्याने बहुमत चाचणीच्या वेळी हात उंचावून मतदान घ्यावे अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी पत्रकारांना सांगितले.
राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बहुमताच्या चाचणीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे बटन दाबूनच मतदान व मतमोजणी पार पडली पाहिजे. त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय अवलंबू नये. मात्र राज्य विधानसभेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणाच नसल्याचे राज्य विधानसभा सचिवालयाचे प्रधान सचिव ए. पी. सिंह यांनी सांगितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मतदानाच्या वेळी प्रत्येक आमदाराने आपण विरोधात की बाजूने मत देत आहोत हे एका रजिस्टरमध्ये त्यासंदर्भातील स्तंभात नमुद करून त्याच्यापुढे आपले नाव व मतदारसंघाचा उल्लेख करून स्वाक्षरी करायची असते. हीच पद्धत मध्य प्रदेश विधीमंडळ सभागृहात आजवर वापरली जात आहे असेही ए. पी. सिंह म्हणाले. या घडामोडी नंतरही मध्य प्रदेश विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी होणार का याविषयी अनिश्चितताच आहे. राज्य सरकारने बहुमत सिद्ध करायचे की नाही याबाबतचा निर्णय मी सोमवारीच देईन असे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी सांगितले आहे.
मध्य प्रदेशमधील राजकीय अस्थिरता व विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी रविवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलाविली होती. मध्य प्रदेशमधील भाजपचे १०७ आमदार असून त्यातील १०५ आमदारांना गुरगाव येथील आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची शिवराजसिंह चौहान यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. भाजपच्या उरलेल्या दोन आमदारांमध्ये शिवराजसिंह चौहान व नारायण त्रिपाठी यांचा समावेश आहे. शिवराजसिंह रविवारी दिल्लीमध्ये होते तसेच आईचे निधन झाल्यामुळे त्रिपाठी आपल्या निवासस्थानीच आहे.

Web Title: Signs of conflict in Madhya Pradesh on floor test, Assembly Speaker silence on Governor's orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.