"मी ती नव्हेच, फक्त नाव..."; आनंद साजरा केल्यावर पलटी, सत्य समोर येताच कुटुंबाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:31 IST2026-03-12T11:31:00+5:302026-03-12T11:31:55+5:30
एका सामान्य कुटुंबातील मुलीने एवढं मोठं यश मिळवलं असं प्रत्येकाला वाटत होतं. मात्र या आनंदावर एका छोट्याशा चुकीमुळे विरजण पडलं.

फोटो - आजतक
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका सामान्य कुटुंबात आनंदाची लाट उसळली. शिखाने UPSC मध्ये ११३ वी रँक मिळवल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. शेजारी, नातेवाईक आणि ओळखीचे लोक अभिनंदन करण्यासाठी घरी पोहोचू लागले. एका सामान्य कुटुंबातील मुलीने एवढं मोठं यश मिळवलं असं प्रत्येकाला वाटत होतं. मात्र या आनंदावर एका छोट्याशा चुकीमुळे विरजण पडलं.
काही वेळातच यामागचं सत्य समोर आलं आणि संपूर्ण प्रकरणालाच एक कलाटणी मिळाली. जेव्हा रोल नंबर आणि संपूर्ण यादी पुन्हा तपासली गेली, तेव्हा खरी परिस्थिती स्पष्ट झाली. जो ११३ वा रँकला शिखा आपला समजून बसली होती, तो प्रत्यक्षात हरियाणाच्या दुसऱ्या शिखाची होता. बुलंदशहरच्या शिखाने स्वतः या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपली चूक मान्य केली आहे.
"मी फक्त नाव पाहिलं, रोल नंबर पाहिला नाही"
शिखाने सांगितलं की, निकाल लागल्यानंतर तिने UPSC च्या PDF यादीत आपलं नाव पाहिलं आणि ती भावूक झाली. त्यावेळी तिने रोल नंबर तपासला नाही. शिखाच्या म्हणण्यानुसार, "ज्या उमेदवाराची निवड झाली आहे मी ती नव्हेच, दुसरी शिखा आहे. आमचं नाव सारखंच आहे. मी फक्त नाव पाहिलं, रोल नंबर पाहिला नाही, हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. "
संपूर्ण कुटुंब शिखाच्या यशाच्या आनंदात
शिखाचे वडील प्रेमचंद यांनीही या प्रकरणाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, जेव्हा शिखाने आपलं नाव पाहिलं तेव्हा ती खूप भावूक झाली आणि तिने लगेच घरच्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यावेळी प्रेमचंद रुग्णालयात होते. मुलगी नाव पाहताच गहिवरून गेली आणि तिने आम्हाला सांगितलं. आम्हालाही वाटलं की आपल्या लेकीची निवड झाली आहे. काही काळ संपूर्ण कुटुंब शिखाच्या या यशाच्या आनंदात होते.
नातीच्या शिक्षणाला प्राधान्य
ही बातमी आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचताच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. सोशल मीडियावरही शिखाच्या यशाची चर्चा रंगली. शिखाचे कुटुंब अत्यंत सामान्य पार्श्वभूमीचे असल्याने ही गोष्ट लोकांना प्रेरणादायी वाटत होती. तिचे आजोबा बुलंदशहरमधील एका इंटर कॉलेजमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मर्यादित उत्पन्न असूनही त्यांनी नेहमीच नातीच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं.
प्रशासनानेही घेतली दखल
सुरुवातीला जेव्हा ही बातमी आली, तेव्हा लोक म्हणू लागले की एका शिपायाच्या नातीने कठीण परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली. मात्र नंतर नावातील साधर्म्यामुळे गोंधळ झाल्याचं स्पष्ट झालं. ही बातमी वेगाने पसरल्यानंतर स्थानिक प्रशासनानेही या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. शिखाच्या वडिलांनी स्पष्ट केलं की, नाव सारखं असल्यामुळे हा गैरसमज झाला असून खरी निवड हरियाणातील रोहतक येथील शिखाची झाली आहे.