सौदी एअरलाईन्सच्या विमानाला मुंबई विमानतळाने परवानगी नाकारली; लखनौच्या विमानतळावर 'इमर्जन्सी लँडिंग'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:13 IST2026-01-30T18:10:35+5:302026-01-30T18:13:28+5:30
Saudi Airlines SV-891 Emergency Landing Lucknow: लखनऊ-जेद्दाह सौदी एअरलाईन्सच्या विमानात केबिन प्रेशरचा बिघाड! प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने विमान पुन्हा लखनऊकडे वळवण्यात आले.

सौदी एअरलाईन्सच्या विमानाला मुंबई विमानतळाने परवानगी नाकारली; लखनौच्या विमानतळावर 'इमर्जन्सी लँडिंग'
लखनऊ: लखनऊच्या अमौसी विमानतळावर आज दुपारी सौदी एअरलाईन्सच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले, त्यानंतर तातडीने लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. या विमानातील सर्व ३०० प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
सौदी एअरलाईन्सचे हे विमान लखनऊहून सौदी अरेबियाकडे झेप घेणार होते. मात्र, टेक-ऑफ होताच विमानात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे संकेत मिळाले. वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला तातडीने माहिती दिली. यानंतर विमानतळावर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करून 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला. त्यापूर्वी वैमानिकाने मुंबई विमानतळाकडे आपत्कालीन परिस्थितीत उतरण्याची परवानगी मागितली होती. परंतू ती नाकारण्यात आल्याने विमानाला परत लखनौकडे वळविण्यात आले.
विमान मुंबईच्या हवाई क्षेत्रात पोहोचले असताना अचानक केबिनमधील हवेचा दाब कमी झाला होता. सौदी एअरलाईन्सचे फ्लाइट क्रमांक SV-891 हे विमान लखनौहून जेद्दाहला निघाले होते. केबिन प्रेशर कमी झाल्याने प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. सुमारे २७५ प्रवासी विमानातून प्रवास करत होते. तब्बल ८२ मिनिटे हा थरार सुरु होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर विमानाने पुन्हा जेद्दाहसाठी उड्डाण केले.
धावपट्टीवर काही काळ विस्कळीत वाहतूक
या इमर्जन्सी लँडिंगमुळे लखनऊ विमानतळावरील इतर विमानांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. काही विमानांना हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या, तर काही विमानांचे उड्डाण लांबणीवर पडले.