शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:24 IST2025-10-07T16:19:58+5:302025-10-07T16:24:07+5:30
तपासादरम्यान पोट्टी यांच्या बहिनीच्या तिरुवनंतपुरममधील घरातून दोन पेडस्टल जप्त करण्यात आले. दरम्यान, देवस्वम बोर्डाने आरोपांचे खंडन केले असून पॅनल उन्नीकृष्णन पोट्टी यांच्याकडे देण्यात आले नाही, असे म्हटले आहे....

शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
तिरुवनंतपुरम : केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिर सध्या सोन्याच्या चोरीच्या मुद्द्यावरून जबरदस्त चर्चेत आहे. या गंभीर आरोपांनी राज्यातील राजकारणही प्रचंड तापले आहे. काँग्रेसप्रणीत विरोधी पक्ष यूडीएफने (UDF) या मुद्यावरून सलग दुसऱ्या दिवशी केरळ विधानसभेत गदारोळ केला. यामुळे कामकाज ठप्प झाले. यामुद्द्यावरून, आता विरोधी पक्षाने देवस्वम बोर्ड मंत्री वी. एन. वासवन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. एवढेच नाही, तर विरोधी पक्ष नेते, व्ही.डी. सतीसन यांनी जोवर मंत्री राजीनामा देत नाहीत, तोवर विरोधी पक्षाचे सदस्य कामकाज चालू देणार नाहीत, असे म्हटले आहे.
दरम्यान केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी शबरीमला मंदिरातील द्वारपालक मूर्तीच्या सोने आणि तांब्याच्या आवरणात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने एडीजीपी एच. वेंकटेश यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष टीम देखील (SIT) तयार केली आहे. हा तपास त्रिशूरच्या केईपीएचे सहायक निदेशक एस. शशिधरन, आणि IPS च्या देखरेखीत होईल. महत्वाचे म्हणजे, हा तपास सहा आठवड्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हा वाद, मंदिराच्या गर्भगृहाबाहेरील दगडाच्या द्वारपालांच्या मूर्तींवर सोन्याचा मुलामा असलेल्या तांब्या अवरणाशी संबंधित आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, त्रावणकोर देवस्वम बोर्डाने या अवरणाच्या दुरुस्तीसाठी काढून उन्नीकृष्णन पोट्टी नामक स्पॉन्सर कडे दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये पहिल्यांदा सोन्याची झळाळी असलेले अवरण दुरुस्तीसाठी हटवण्यात आले होते. 39 दिवसांनंतर ते 38.258 किलो वजनासह परत करण्यात आले. यात 4.541 किलोची घट आढळून आली. सप्टेंबर 2025 मध्ये दुसऱ्यांदा दुरुस्तीसाठी पुन्हा देण्यात आले. यावेळी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती.
तपासादरम्यान पोट्टी यांच्या बहिनीच्या तिरुवनंतपुरममधील घरातून दोन पेडस्टल जप्त करण्यात आले. दरम्यान, देवस्वम बोर्डाने आरोपांचे खंडन केले असून पॅनल उन्नीकृष्णन पोट्टी यांच्याकडे देण्यात आले नाही, असे म्हटले आहे.
दरम्यान, देवस्वम बोर्डाने हे आरोप फेटाळले आहेत. बोर्डानुसार, 14 सोन्याच्या शीटचे एकूण वजन 38 किलो होते, ज्यात 397 ग्रॅम सोने होते. नंतर चेन्नईतील "स्मार्ट क्रिएशन्स" मध्ये नूतनीकरण करताना 10 ग्रॅम अतिरिक्त सोन्याचा वापर करण्यात आला आणि आता एकूण सोन्याचे प्रमाण 407 ग्रॅम असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. बोर्डाने चोरीचे सर्व आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.