मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट हटली! युमनाम खेमचंद यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 19:33 IST2026-02-04T19:32:45+5:302026-02-04T19:33:12+5:30
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे संपुष्टात आली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद यांनी मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट हटली! युमनाम खेमचंद यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
गेल्या अनेक महिन्यांपासून अशांततेच्या छायेत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर लोकशाहीचे पुनरागमन झाले आहे. राज्यातील राष्ट्रपती राजवट अधिकृतपणे संपुष्टात आली असून, भाजपचे ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद यांनी मणिपूरचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल अजय भल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मेतई समुदायाचे प्रभावी नेतृत्व आणि आरएसएसचे खंदे समर्थक मानले जाणारे खेमचंद यांच्या खांद्यावर आता मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
राष्ट्रपती राजवट का हटवण्यात आली?
मे २०२३ मध्ये मेतई आणि कुकी समुदायांत झालेल्या जातीय हिंसेमुळे मणिपूर होरपळून निघाले होते. या हिंसाचारात २६० हून अधिक लोकांचा बळी गेला, तर हजारो नागरिक बेघर झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राजीनामा दिला होता आणि केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. आता वर्षभरानंतर परिस्थिती सुधारत असल्याचे पाहून गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करत राष्ट्रपती राजवट तातडीने मागे घेतली आहे.
कोण आहेत युमनाम खेमचंद?
६२ वर्षीय युमनाम खेमचंद हे पेशाने इंजिनिअर असून ते सिंगजामेई विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बीरेन सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. २०२२ मध्येही त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. संघ परिवाराशी असलेले जवळचे संबंध आणि प्रशासकीय कामाचा अनुभव यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.
#WATCH | Imphal: BJP Manipur Legislature Party leader Yumnam Khemchand Singh takes oath as the Chief Minister of Manipur
— ANI (@ANI) February 4, 2026
Governor of Manipur Ajay Bhalla administers the oath at the Lok Bhavan. pic.twitter.com/Ri1Et4J0Oa
आमदार दलाच्या नेत्याची निवड आणि राजकीय पेच
मंगळवारी भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत खेमचंद यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत गोविंद दास आणि टी. विश्वजीत सिंह यांची नावे आघाडीवर होती, पण पक्षनेतृत्वाने खेमचंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कुकी समुदायाच्या आमदारांनी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याची मागणी केल्याने ही निवड प्रक्रिया अत्यंत संवेदनशील वातावरणात पार पडली.
मणिपूर विधानसभेचे गणित
६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपचे स्पष्ट वर्चस्व आहे. भाजपचे स्वतःचे ३७ आमदार असून एनडीएचे घटक पक्ष असलेल्या एनपीपी (६ आमदार) आणि नागा पीपुल्स फ्रंट (५ आमदार) यांचाही सरकारला पाठिंबा आहे.