राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन; केंद्राने बंगाल सरकारकडून मागवला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 11:36 IST2026-03-08T11:32:57+5:302026-03-08T11:36:43+5:30

President Draupadi Murmu : राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री, ना मुख्य सचिव अन् ना पोलीस महासंचालक उपस्थित होते.

President Draupadi Murmu: Violation of protocol in President Draupadi Murmu's program; Center seeks report from West Bengal government | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन; केंद्राने बंगाल सरकारकडून मागवला अहवाल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कार्यक्रमात प्रोटोकॉलचे उल्लंघन; केंद्राने बंगाल सरकारकडून मागवला अहवाल

President Draupadi Murmu :पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र पाठवून संपूर्ण घटनेबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालात राष्ट्रपतींना अपेक्षित प्रोटोकॉल न देणे, मार्गाबाबत योग्य माहिती न देणे, तसेच इतर व्यवस्थांमधील त्रुटींबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण अचानक बदलल्याने वाद

राष्ट्रपती मुर्मू या उत्तर बंगाल दौऱ्यावर असताना दार्जिलिंग जिल्ह्यातील 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. सुरुवातीला हा कार्यक्रम फांसीदेवा ब्लॉकमधील बिधाननगर येथे आयोजित करण्याचे ठरले होते, जेथे मोठ्या संख्येने संथाल आदिवासी समाजातील लोक उपस्थित राहू शकले असते. मात्र राज्य प्रशासनाने सुरक्षा, गर्दी आणि इतर कारणे सांगत कार्यक्रमाचे ठिकाण बागडोगरा विमानतळाजवळील गोसाईंपूर येथे हलवले. राष्ट्रपतींनी स्वतः या बदलाबाबत नाराजी व्यक्त करत नवीन ठिकाण लहान असल्याने अनेकांना कार्यक्रमात सहभागी होता आले नसल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना “लहान बहीण” म्हणत विचारले की, त्या त्यांच्यावर नाराज आहेत का? कारण ना मुख्यमंत्री आणि ना कोणताही मंत्री त्यांना स्वागतासाठी उपस्थित होता. राष्ट्रपती पदाच्या सन्मानासाठी प्रोटोकॉलचे पालन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रोटोकॉलच्या अनेक बाबींचे उल्लंघन?

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी असलेल्या ‘ब्लू बुक’ नियमांचे अनेक स्तरांवर उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. राष्ट्रपतींचे स्वागत आणि निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक उपस्थित नव्हते. त्यांच्या स्वागतासाठी केवळ सिलीगुडीचे महापौर उपस्थित होते. तसेच राष्ट्रपतींसाठी तयार करण्यात आलेल्या शौचालयात पाणी नसल्याचेही सांगितले जात आहे. प्रशासनाने वापरलेला मार्ग कचऱ्याने भरलेला होता, अशीही माहिती समोर आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी दार्जिलिंगचे जिल्हाधिकारी, सिलीगुडीचे पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमित शाह यांची टीका

या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत पश्चिम बंगालमधील टीएमसी सरकारवर टीका केली. त्यांनी या घटनेला ‘अराजक वर्तन’ असे संबोधत भारताच्या राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला. शाह यांनी म्हटले की, राष्ट्रपती पदाच्या प्रोटोकॉलची उघडपणे पायमल्ली करण्यात आली आहे. हे भारताच्या संवैधानिक लोकशाहीच्या मूल्यांवर आघात करणारे आहे. विशेषतः आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात असा प्रकार घडणे देशासाठी लाजिरवाणे आहे.

ममता बॅनर्जी यांचे आरोप फेटाळले

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, त्या राष्ट्रपतींचा पूर्ण सन्मान करतात, मात्र राष्ट्रपती राज्यात कितीही वेळा आल्या तरी प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नसते. त्या म्हणाल्या, मी सध्या आंदोलनात व्यस्त आहे आणि ज्या कार्यक्रमाचा उल्लेख केला जात आहे, त्याबद्दल मला माहितीच नव्हती. त्या आंतरराष्ट्रीय परिषदेसंदर्भात राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान, या प्रकरणामुळे केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title : राष्ट्रपति मुर्मू के बंगाल दौरे पर प्रोटोकॉल उल्लंघन; केंद्र ने मांगी रिपोर्ट।

Web Summary : राष्ट्रपति मुर्मू के बंगाल दौरे के दौरान प्रोटोकॉल उल्लंघन पर केंद्र ने राज्य सरकार से रिपोर्ट तलब की। कार्यक्रम स्थल बदलने से असंतोष। ममता बनर्जी ने आरोपों को नकारा, व्यस्तता बताई। विवाद बढ़ा।

Web Title : Protocol breach during President Murmu's Bengal visit; Centre seeks report.

Web Summary : Centre demands report from Bengal over protocol breach during President Murmu's visit. Event location changed, causing discontent. Mamata Banerjee denies disrespect, citing prior commitments. Controversy escalates tensions.