प्रतीक यादव यांचा मृत्यू की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ६ जखमांचा उल्लेख; रक्ताच्या गुठळीने घेतला जीव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 19:47 IST2026-05-13T19:41:36+5:302026-05-13T19:47:07+5:30

प्रतीक यादव यांच्या संशयास्पद स्थितीत झालेल्या या मृत्यूनंतर आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला.

Prateek Yadav Post Mortem Report Death caused by massive pulmonary thromboembolism 6 antemortem injuries found | प्रतीक यादव यांचा मृत्यू की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ६ जखमांचा उल्लेख; रक्ताच्या गुठळीने घेतला जीव!

प्रतीक यादव यांचा मृत्यू की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ६ जखमांचा उल्लेख; रक्ताच्या गुठळीने घेतला जीव!

Pratik Yadav Post Mortem Report: समाजवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव (३८) यांच्या मृत्यूने उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणि यादव कुटुंबात खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी पहाटे संशयास्पद स्थितीत झालेल्या या मृत्यूनंतर आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.

नेमका मृत्यू कशामुळे झाला?

किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या सहा तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने प्रतीक यादव यांचे पोस्टमार्टम केले. रिपोर्टनुसार, मृत्यूचे मुख्य कारण मॅसिव्ह पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम हे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रतीक यांच्या पायाच्या नसेत रक्ताची एक मोठी गुठळी तयार झाली होती. ही गुठळी रक्तासोबत वाहून फुफ्फुसाच्या मुख्य नसेत जाऊन अडकली. यामुळे फुफ्फुसाचा ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाला आणि काही मिनिटांतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत याला कार्डिओरेस्पिरेटरी कोलॅप्स म्हणतात.

शरीरावर ६ जखमा; मृत्यूचे गूढ वाढले?

सुरुवातीला काही रिपोर्ट्समध्ये शरीरावर जखमा नसल्याचे म्हटले होते, मात्र सविस्तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ६ गंभीर जखमांचा उल्लेख करण्यात आला आहे. उजव्या बाजूच्या छातीखाली १४x७ सेमीची मोठी जखम आढळली आहे, जिचा रंग हिरवा-पिवळा झाला होता.

जखमा किती जुन्या? 

डॉक्टरांच्या मते, पहिल्या तीन जखमा ५ ते ७ दिवस जुन्या आहेत, तर चौथी, पाचवी आणि सहावी जखम मृत्यूच्या साधारण एक दिवस आधीची आहे. सर्व जखमांच्या खाली रक्त साकळल्याचे दिसून आले आहे. या जखमांमुळे मृत्यू झाला नसला तरी, मृत्यूच्या काही दिवस आधी नेमके काय घडले होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

किचनमध्ये कोसळले अन् पुन्हा उठलेच नाही...

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे प्रतीक यादव यांची तब्येत अचानक बिघडली आणि ते बेशुद्ध होऊन किचनमध्ये पडले. कुटुंबीयांनी तातडीने डॉक्टरांना बोलवले, मात्र घरी पोहोचलेल्या डॉक्टरांना त्यांची नाडी सापडली नाही. पहाटे ५:५५ वाजता त्यांना लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रतीक यादव यांचा मृत्यू हाय-प्रोफाईल असल्याने संपूर्ण पोस्टमार्टम प्रक्रियेची व्हिडियोग्राफी करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि शरीरातील विषबाधा किंवा इतर शक्यता तपासण्यासाठी डॉक्टरांनी त्यांचे विसरा आणि हृदयाचे नमुने हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि केमिकल तपासणीसाठी सुरक्षित ठेवून पोलिसांकडे सोपवले आहेत.

कोण होते प्रतीक यादव?

प्रतीक यादव हे मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे चिरंजीव होते. ते राजकारणापासून दूर असून फिटनेस आणि रिअल इस्टेट व्यवसायात सक्रिय होते. त्यांनी लंडनच्या लीड्स युनिव्हर्सिटीतून एमबीए केले होते. त्यांच्या पत्नी अपर्णा यादव या भाजपच्या नेत्या असून उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. गेल्या काही काळापासून पती-पत्नीच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

Web Title : प्रतीक यादव की मौत: दुर्घटना या हत्या? पोस्टमार्टम से मिले सुराग

Web Summary : प्रतीक यादव की मौत से विवाद। पोस्टमार्टम में छह चोटें और रक्त का थक्का कारण बताया गया। पुरानी चोटें मौत से पहले की घटनाओं पर सवाल उठाती हैं। हत्या का संदेह।

Web Title : Pratik Yadav's Death: Accident or Murder? Postmortem Reveals Clues

Web Summary : Pratik Yadav's death sparks controversy. Postmortem reveals six injuries and blood clot as cause. Old injuries raise questions about events before death. Foul play suspected.